Monday, 1 June 2020

प्रशिक्षण

बॅंकेच्या सेवेत असतांना वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अनेकवेळा जाण्याचा योग आला. प्रशिक्षण कधी २, ३ दिवसांचे, एक आठवड्याचे अथवा १०, १२ दिवसांचे असे. त्यावेळी घर सोडून बोर्डिंग सारखे बॅंकेच्या प्रशिक्षण केंद्रावर तर कधी युनियनच्या केंद्रावर रहावे लागे. अशावेळी वेगवेगळे अनुभव मिळायचे. बॅंकेतलेच सहकारी पण अनेक ठिकाणहून आलेले असत. त्यांचे अनुभव ऐकायला मिळत. कधी गमतीदार किस्से तर कधी कटु अनुभव. व्यक्त्ती तितक्या प्रकृती! प्रशिक्षण केंद्र म्हणजे तेव्हा मला तरी एक ताजे तवाने करणारे ठिकाण वाटायचे. म्हणून त्यांना तर मी ‘माहेर’ म्हणत असे. प्रशिक्षणासाठी सूचना मिळाली अन माझ्या कामाशी निगडीत (म्हणजे करत असलेल्या डेस्क वर्कशी) असेल तर मी नेहमीच जायला उत्सुक असायचे त्यानुसार मला पाठवलेही जायचे. 

एकतर रोजच्या नेहमीच्या कामापासून थोडी विश्रांती, अन नवे लोक, नवे अनुभव यांची शिदोरी सोबत घेऊन परत आल्याने कामाचा उत्साहही वाढलेला असायचा. प्रशिक्षण केंद्रावर चहापाणी, नाश्ता, जेवण वगैरे सोयी व्यवस्थित असूनही लोकांच्या तक्रारी, कुरबुरी पाहून नवल वाटायचे. कोणी युनियन लीडर वगैरे जर प्रशिक्षणासाठी आलेले असेल तर तो वर्गाला कमी आणि लोकांच्या, मित्रांच्या भेटीतच वेळ घालवी; हे पाहून वाईट वाटे.बॅँक प्रत्येकावर एवढा खर्च करते आणि हे लोक काय करतातॽ असा प्रश्न पडे. पण जेव्हा हेच लोक एकादी बातमी, स्टाफ सेवा, वेतन, इतर अडचणींवरील उपाय घेऊन येत तेव्हा वाटे खरच! त्यांच्या भेटी गाठी त्यावेळी आवश्यक होत्या. असो. – 

त्या त्या प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक वेळी नविन मित्र, मैत्रिणी मिळाल्या. ज्यांच्याशी निवृत्तीनंतरही संवाद होत असतो.  भेटीगाठी होतात. अडीअडचणीला एकमेकांची मदतही मिळते. प्रशिक्षणाचा मला तर भरपूर उपयोग झाला आहे. माझ्यातला बुजरेपणा जाऊन चारचौघात बोलतांना भीती वाटत नाही. सध्याच्या काळात स्टेज करेज म्हणतात न ते चांगले अवगत झाले आहे. माणसे ओळखता येऊ लागली आहेत. मतलबी, स्वार्थी लोक तसेच निःस्वार्थ भावनेने मदत करणारे लोक, अलिप्त असणारे लोक अशा अनेक छटा माणसांच्या असल्या तरी त्यांच्यापैकी कोणाला केव्हा जवळ करायचे आणि कोणाला दूर ठेवायचे हे आता ज्ञात झाले आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत न घाबरता धैर्याने तोंड देता येईल याचा आत्मविश्वास हे सारे या ‘प्रशिक्षण’ म्हणा की ‘शिबीर’ म्हणा या उपक्रमाने दिले असे निश्चित वाटते. म्हणूनच या उपक्रमाचे व ते करण्याची संधी मिळालेल्या माझ्या बँकेचे, तेथील अधिकाऱ्यांचे, प्रशिक्षणार्थींचे आभार न मानता ऋण मान्य करणे मला उचित वाटते.

निर्मला देविदास जैन. 


No comments:

Post a Comment