काही वेळापूर्वी एक WhatsApp forward वाचलं. ज्यात म्हंटलंय की कुणासाठी तरी देव बना. कोरोनाच्या खडतर काळात उसने दिलेले पैसे परत मागू नका. सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती आता बरी नाहीये वगैरे वगैरे. पुढे म्हंटलंय की आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं पाप करू नका, देवदूत बना वगैरे वगैरे. वाचताना खरंच खूप उदात्त विचार वाटले. पण आचरण खरोखर कठीण आहे नाही का?
मी जर कोणाला पैसे उसने दिलेत ते माझ्या अडचणीच्या काळात मी परत मागणार की दुस-याकडे हात पसरणार? बरं कोरोना आत्ता आलाय चार महिन्यांपूर्वी. इथे लोकं पैसे उसने मागताना लोकांच्या भावनेला हात घालतात. आठ दिवसात पैसे परत करतो म्हणतात. मग जे जातात ते आठ दिवस काय आठ महिने झाले तरी तोंड दाखवत नाहीत.
ही मंडळी नात्यातली असली तर पैसे मागायची अधिकच पंचाईत. माझ्या मैत्रीणीचा नवरा त्याच्या एका भावाला अक्षरशः दर महिन्याला पैसे देतो. आणि तो भाऊ सोंड्या बसून खातो. एखाद महिना उशीर झाला की त्या भावाचे वडील मैत्रीणीच्या नव-याला फोन करतात "पगार झाला नाही वाटतं?" अरे काय चाललंय काय? किती गृहीत धरायचं? त्याला त्याची बायका मुलं, आजारपणं, कमी आवक, खर्चात कमी नाही अशी स्थिती नाही?
माझ्या बाबतीतही दोन तीन गोष्टी या प्रकारच्या झाल्या आहेत. बायको आजारी आहे. उपचाराला पैसे नाहीत. एका कामाचे पैसे मिळणार आहेत पण आत्ता अर्जन्सी आहे असं काकुळतीने सांगून, हवं तर हा पन्नास साठ हजाराचा सिंथेसायझर ठेवा पण मला पैसे द्या असं सांगून पैसे घेऊन गेलेला माणूस तीन वर्ष झाली तरी पैसे परत देतोय. सिंथेसायझर ठेवून घ्यायलाच हवा होता असं मनात आलं माझ्या तर तो माझा दुष्टपणा आहे?
मला आठवतं आई दादा, सासू सासरे नेहेमी सांगायचे कुणासमोरही हात पसरायची पाळी येईल असं वागू नका. दहा रूपये मिळाले तरी पाच रूपयेच मिळालेत समजून त्यातला रूपया तरी वाचवा. आपण काटकसरीने वागावं.
माझा बुवा (नवरा) मला नेहेमी सांगतो उसने पैसे परत येणार नाहीत हे गृहीत धरूनच पैसे दे कोणाला. अन्यथा वाईटपणा आला तरी चालेल पैसे द्यायचे नाहीत. पण असं सांगुनही मी माती खाल्लीच. दिले एका रड्याला पैसे 2019 च्या ऑगस्टमधे. लावल्या त्याने शेंड्या डिसेंबरपर्यंत. मग तगादा लावल्यावर मला चेक दिला तोही पोस्टडेटेड. चेकवर लिहिलेल्या तारखेला भरला मी बॅन्केत पण महाशय खंकच ना! कसा वठणार चेक. झाला डिसाॅनर. आता ठरवलं कोरोना फिरोना असला तरी आपण देवदूत बिवदूत बनायचं नाहीये. पोलीसात फसवणुकीची तक्रार दाखल करायचीच.
लोकांचा गैरफायदा घेताना कोरोना वगैरे अडचणी आठवतात हे बरोबर नाही. आपलेच पैसे मागताना 'ह्याला डिप्रेशन तर येणार नाही ना? हा स्वतःला संपवणार तर नाही ना?" हा विचार करून गप्प बसायचं आणि स्वतःला देवदूत म्हणवून घ्यायचं? नको रे बाबा असं देवदूतपण.
Anagha Joshi
No comments:
Post a Comment