Monday, 1 June 2020

अतिथी देवो भव!



शेतकरी कुटुंब आणि त्यांचे ग्रामीण जीवन ह्याच मला अगदी लहानपणापासूनच आकर्षण आहे.

माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीमुळे असाच एकदा एका शेतकऱ्यांच्या घरी संध्याकाळी जाण्याचा योग आला. खेड-शिवापूर जवळच्याच एका छोट्याशा वस्तीत हे शेतकरी कुटुंब गेली कित्येक वर्षे राहात आहे. त्यांच्याकडे पिढीजात सर्व शेतकरीच. वडिलोपार्जित अंजीराच्या बागा व शेती आहे. चार एकर जमीन आहे. अंजीराबरोबर पेरुच्याही बागा आहेत. बाकी फळं म्हणजे पपई, पपनस, चिकू, सीताफळ, रामफळ, जांभूळ, केळी, आंबा, फणस, डाळिंब आहेतच. शेतकरी मामांच्या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व काही उत्तम प्रतीचंच पिकवलं जातं. सिझनल धान्य म्हणजे मटार, ज्वारी, तांदूळ, पावटा. सर्व काही शेतात काढतात. सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. सर्व घरचंच असल्यामुळे ह्या अन्नाची गोडी अवीट आहे.

आम्ही मैत्रिणी त्यांच्या घरी पोचल्यावर पाणी दिल्यावर त्यांनी लगेचच त्यांच्या बागेतल्या ताज्या अंजीरांची टोपलीच आमच्या पुढ्यात आणून ठेवली. हवी तेवढी पोटभर अंजीरं (साखरेसारखी गोड व घट्ट) खायला दिली. नंतर घरच्या बागेतल्या ताज्या लिंबाचे सरबत दिलं. उन्हाळा असून शरीरासह मनालाही थंडगार शिडकावा मिळाला.

नंत आम्ही त्यांचं शेत, शिवार बघायला बाहेर पडलो. प्रथम त्यांच जुनं घर बघितले. तिथे घरातील बायकांचे धान्य कांडण व निवडण-टिपण चालले होते. वर माडीवर असंख्य लसूण गड्ड्याच्या माळा टांगलेल्या होत्या. धान्याची हलगी ठेवली होती. नंतर देवळात गेलो. जरा वेगळ्याच धर्तीचे देऊळ होते. त्यानंतर शेतावर जायला निघालो. गार वारा सुटला होता. प्रदूषणमुख्त शुद्ध हवेत श्वास घ्यायला मिळाला. आजच्या शहरी वातावरणात अशी हवा अनुभवायला मिळणं हे खरोखरीच परम भाग्यच म्हणावे लागेल.

एवढं विस्तीर्ण शिवार व त्यात डोलणारी पिकं, वृक्ष, वेली आणि खंड्या, बगळे यांसारखे सुंदर व क्वचितच आढळणारे पक्षी. ७०∕७५ झाडं असलेल्या अंजीराच्या बागा व प्रत्येक पानागणिक लागलेले असंख्य अंजीर. गाई-गुरं ही सर्व समृद्धी पाहून मन अगदी सुखावून गेलं. आणि ह्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्या माणसांच्या ‘मनाची समृद्धी’ पाहून तर मी अगदी नतमस्तक झाले. काय ते आदरातिथ्य! काय ते देणाऱ्यांचे हात! कितीदा मनात आल् ह्या दात्यांच्या हातांचीच पूजा करावी व असेच त्यांच्या सारखेच ‘सेवाभावी हात’ आपल्याला लाभावेत ह्यासाठी ईश्वराची प्रार्थना करावी. अंजीराच्या बागेत फिरताना पावलागणिक हे मामा स्वतः आम्हाला सगळ्यांना टोपलीत ताजे काढलेले अंजीर २∕२ - ३∕३ अगदी पुरे-पुरे म्हणून सुद्धा आग्रहाने, मनापासून, प्रेमाने खायला देत होते. गळ्यांत माळा बघितल्यावर मला वाटलं मामा वारकरी आहेत. नुसतेच वारकरी नाहीत तर ते अध्यात्म प्रत्यक्ष जगतात. त्यांच्या सर्व कुटुंबीच्यांच्या जगण्यात मला अध्यात्म दिसलं.

दोघी सुना (जावा-जावा) हसतमुखाने आमच्यासाठी चुलीवर जेवण बनवण्यात मग्न होत्या. वडील (मामा) दिवसभर शेतात. आई दिवसभर हायवेला फळं विकायला. बायका घरात व शेततली सुद्धा कामं करतात. मामांची मुले नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात शेतीची कामं करतात. दिवसभर घरातील प्रत्येक जण कष्टाला जुंपलेला असतो. कधी कोणाच्याही कपाळावर आठी नाही. कोणी कधी त्रासलेलं नाही. मामांनी आग्रहाखातर एक छोटा अभंग म्हटला. मग पंक्ती बसल्या. एकाद्या मोठ्या हॉटेलमधील जेवण सुद्धा फिकं पडेल असा स्वैपाक दोघी जावांनी केला होता. एवढे कष्ट घेऊन त्यांनी खूप निरनिराळे प्रकार आमच्यासाठी बनवले होते. जीव ओतून अगदी मनापासून प्रेमाने त्यांनी आम्हाला जेवू घातले. आमची रसना अगदी तृप्त झाली. आणि माझ्या तोंडून शब्द आले ‘ अन्नदाता सुखी भव!’

जेवल्यावर त्यांनी आमच्या प्रत्येकीच्या ओट्या भरल्या. प्रत्येकीला त्यांच्या शेतातल्या भाज्या व अंजीर बरोब दिले. एवढे दिवसभर कष्ट करूनही उपास असतांना सुद्धा मामा देवळात भजनाला गेले आणि ते तिकडून आल्यावर नंतर उपवास सोडणार होते. त्यांच्या ह्या श्रद्धेला व प्रेमाला माझ्या हृदयापासून त्रिवार सलाम आहे. पुन्हा प्रत्येक सीझनला आग्रहाचे निमंत्रण घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.



मानसी जोशी

1 comment:

  1. ताई
    हीच खरी श्रीमंती....
    खेड शिवापूर अगदी लहान वयापासून पहातोय,अनुभवतोय...
    मला वाटते तू वर्णन केलेला काळ ८०/९० मधील असावा....तसे नमूद केलेस तर बरे...
    कारण आता टोल नाका आल्यामुळे सगळीच आर्थिक/सामाजिक गणिते बदलली आहेत...
    मी एवढा मोठा नक्कीच नाही की मोठ्या बहिणीस काही सुचवु शकेन...अक्षरशः तो काळ मी जगलो वाचताना...कारण हेच कुठे ना कुठे सह्याद्रिच्या कुशितअनुभवलय ट्रेकिंग करताना...

    ReplyDelete