Friday, 26 June 2020

हे बंध रेशमाचे

Android Kunjappa Version 5.25 आणि Her ही आहेत दोन नावं.सिनेमा हे माध्यम आहे व्यक्त होण्याचं.एकाची भाषा आहे मल्याळम् तर  दुसऱ्याची इंग्रजी.मांडणी, वातावरण, संस्कृती हे वेगळं असणं मग स्वाभाविकच.असं असलं तरी या दोन्ही चित्रपटांतून मानवी भावभावनांची आंदोलनं उलगडली आहेत.

Android Kunjappa..मध्ये वाढत्या वयाबरोबर हटवादी झालेला, आपलं तेच खरं, योग्य असं मानणारा बाप भास्करन् .इथे आपल्या गुणवत्तेची कदर होत नाही अन् ज्याच्यासाठी आपण दूरची नोकरी घेत नाही त्या बापाला आपली किंमत नाही यात घुसमटलेला सुब्रमण्यम्.शेवटी नाईलाजाने रशियाला नोकरीसाठी निघून जातो खरा. पण मनात वडिलांची काळजी दाटलेली  राहतेच.काही महिन्यांनी वडील पडल्याची बातमी येते.अस्वस्थ  झालेला सुब्रमण्यम्,त्याच्याच कंपनीने तयार केलेला ह्यमनाॅईड रोबो घेऊन घरी येतो.त्याला,म्हणजेच रोबो कुंजप्पाला सर्व प्रकारच्या सूचना देऊन परत जातो.
 
इथून सुरू होतो नात्याचा एक वेगळा प्रवास.भास्करन् आणि कुंजप्पा मधली नोकझोक बघताबघता बट्टीत बदलते.कुंजप्पाशी गप्पा मारायला आलेल्या गावातल्या आज्या त्याला ,' कुंजा, तुझ्या देशात नंगू-पुंगू फिरलं तर चालतं.इथे नाही हो हे चालणार.लोक हसतील ना तुला'.हे ऐकल्यावर भास्करन् आपल्या टेलरकडून त्याच्यासाठी कपडे शिवतो.आता लुंगी घातलेल्या कुंजप्पाचे बोट धरून भास्करन्  त्याला घेऊन गावभर ऐटीत फिरु लागतो. फिरता फिरता  त्याच्या हाताचा,असण्याचा आधार त्याने स्वत:साठी कधी स्वीकारला हे त्याचे त्यालाच उलगडत नाही.त्याच्या गहिऱ्या झालेल्या नात्याची जाणीवच होते यातून.या दोघांचं प्रेमानं, विश्र्वासानं बांधलेलं वेगळं जग तयार होतं.भास्करन् मुलाची घ्यावी तशी कुंजप्पाची काळजी घेतो.पावसात त्याला थंडी वाजेल म्हणून जपतो.देवळात त्याला प्रवेश नाकारल्यावर वाद घालतो.तर कुंजप्पा भास्करन् ला नदीवर डोकं चोळून आंघोळ घालतो, प्रेमात कसली आलीय जातपात.प्रेम हे त्यापलीकडचं एक सुंदर विश्व असतं ,हे झक्कासपणे सांगतो.मग भास्करन् कुंजप्पाच्या मदतीनं आपल्या प्रेयसीचा शोध घेतो.तिला मेसेजेस करतो.कुंजप्पामुळे भास्करन् चं जगणं अर्थपूर्ण होतं.कुंजप्पा हे एक यंत्र आहे हेच तो विसरतो.म्हणूनच सुब्रमण्यम त्याला नेणार म्हटल्यावर बिथरतो.इतका की कुंजप्पाला घेऊन जंगलात पळून जाण्याचा, मुलापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.
 
आता Her मघला थीडर.
 
ज्यांना आपल्या प्रियजनांना संदेश द्यायचाय,प्रेमभरी पत्र पाठवायची आहेत ; पण एकतर वेळ नाही किंवा लिहीता येत नाही, त्यांच्यासाठी  ऑनलाईन लेखनिकाचं काम करणारी न्यूयॉर्कमधली एक कंपनी. थीडर इथला एक लेखक.भन्नाट भावगर्भ पत्र लिहिण्यात प्रवीण.स्वत:च्या  आयुष्यात अपयशी पण पत्रलेखनातून इतरांची आयुष्य सावरणारा.त्याचं वैवाहिक जीवन संवाद हरवल्यानं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोचलेलं.दिवसा काम अन् रात्री गेम्स आणि अनोळखी लोकांशी चॅटिंग करताना त्याला Artificial intelligence operating system (A I ) चा शोध लागतो.मग थीडर घेऊनच  टाकतो हे डिव्हाईस.थीडरची A I आहे समंथा.ती त्याला आवडणाऱ्या गोष्टी त्याच्याशी बोलू लागते.ऑफिसच्या कामांची वेळोवेळी आठवण करून देते.इतकंच नाही तर त्याने लिहिलेल्या उत्तम पत्रांचं पुस्तकही छापायला देते. कुणीतरी आपल्याला हवंहवंसं असं बोलतंय,ह्या कल्पनेनंच थीडर सुखावतो.मनानं हल्लक होत जातो.तो ज्या ज्या मानवी भावना तिच्याशी शेअर करतो समंथा त्या सगळ्याच अनुभवते जणू. एका क्षणी दोघंही प्रेमातच पडतात एकमेकांच्या.माणूस आणि A I  यातलं अंतरच नाहीसं होतं. थीडरबरोबर आभासी प्रणय करणं,स्वत:ला शारीरिक अनुभूती मिळावी म्हणून सरोगसी शरीराचा वापर करायला थीडरला विनवणं ही या आगळ्यावेगळ्या प्रेमाची परिसीमाच.

एका क्षणी समंथाचा आवाज थीडरला ऐकू येईनासा होतो.सैरभैर झालेला थीडर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर वेड्यासारखा तिला शोधत फिरतो.कासाविस झालेल्या त्याच्या कानावर समंथाचा आवाज पडतोय..हुश्श !!  पण क्षणिकच..ती एकाच वेळी आपल्याबरोबरच अनेकांशी ही जोडलेली आहे,हे समजल्यावर हादरतोच तो.माझी आणि तिची खास प्रेमाची भाषा आहे असं मानत होतो आपण.. हे सगळं फसवंच होतं तर..ती अनेकांशी असंच असेल का बोलत..अशा विचारांच्या भोवऱ्यात गुदमरलेला थीडर भानावर येतो ते समंथाच्या बोलण्यानं. " मी तुझ्यावर प्रेम करते.. मी एक पुस्तक वाचते आहे आणि हे असं पुस्तक ज्यावर मी खूप प्रेम करते..आता त्यातील शब्द माझ्यापासून दूर चालले आहेत......."

हे कानांवर येणारे शब्द,हे आभासी नातं दोन्ही बाजूंनी किती रुजलं होतं मनात हे लक्षात आणून देतात.

भास्करन् आणि थीडर दोघांच्याही आयुष्यात कमतरता होती ती संवादाची..संवादकाची.दोघांचे प्रश्र्न, परिस्थिती वेगळी पण आलेलं एकाकीपण सारखंच. त्यानेच वाढलेली अस्वस्थता,होणारी चिडचिड.कुंजप्पा आणि समंथा यांच्या मुळे आयुष्यात एक अत्यंत सुखद वळण येतं.एक निश्चितता ,निवांतपण लाभतं.आतापर्यंतचे प्रश्र्न, बेचैनी, अस्वस्थता,उदासी निघून जाते.आयुष्यात एक हवाहवासा , " ठहराव " येतो. तो ज्यांच्यामुळे लाभला तीच हातातून निसटून जाताहेत हे बघून आकांत केला जातो हे स्वाभाविकच नाही का ? त्यांच्यामुळेच परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ लाभतं त्यांना. भास्करन् चं मुलाच्या खांद्यावर विश्र्वासानं हात ठेवणं अन् थीडरचं पत्रातून का होईना पत्नीसमोर आपल्या चुका मान्य करणं हे अदभुत घडतं.
 
एरवी संध्याकाळनंतरच भेटणारे घरचे सदस्य सध्या करोनामुळे घरात सतत एकत्र आहेत.यामुळे , ' इतुकें आलो जवळ की या जवळपणाचे झाले बंधन 'अशी परिस्थिती उद्भवली असेलही कदाचित.मग माणसांत राहूनही मन रमविण्यासाठी काॅम्प्युटर,  व्हाॅट्स अॅप, फेसबुक असे अनेक पर्याय स्वीकारले जाताहेत. पण हेही आभासीच जग आहे ना ? जसं भास्करन् आणि थीडर यांना आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेले हे सोबती दीर्घ काळ सोबत नाही करु शकत,माणसांची जागा नाही घेऊ शकत हे समजलं आणि ते आपल्या माणसांकडे परतले.तसंच या आताच्या उलथापालथीच्या काळात आपणही मनोरंजनासाठी या अॅप्सच्या जोडीनं माणसांशीही जोडून घ्यायला हवं. एकमेकांशी  बोलणं, भरभरून सांगणं, आवाजातून  न  बोललेलंही उकलणं हीच नात्याची अन्य जगण्याचीही खरी वीण आहे ना.


2 comments:

  1. खूप छान सांगड घातली आहे.
    ओघवती भाषा, नेमके शब्द, खूप छान

    ReplyDelete
  2. खूप छान सांगड घातली आहे.
    ओघवती भाषा, नेमके शब्द, खूप छान

    ReplyDelete