Monday, 29 June 2020

हिमालयातील पंच पंच पवित्र स्थाने.

भारताच्या उत्तर सीमेवर काश्मीर पासून अरुणाचलपर्यंत २५००∕३००० कि.मी. लांब व ३० ते १५० कि.मी. रुंद असा उंचच उंच उत्तुंग पर्वत पसरलेला आहे. तोच आपला हिमालय होय. भारतीय त्यांना देवभूमी ∕शिवभूमी समजतात. यामध्ये उत्तुंग शिखरे आहेत तशा महाकाय नद्या आहेत व मोठी मोठी ग्लेशियरही आहेत.

अशा देवभूमीमध्ये अनेक मंदीरे व इतर ठिकाणेही अशी आहेत, की आपण ती पवित्र मानतो. त्यातील काही पंच पंच ठिकाणांची आपण माहिती घेऊ.

आता तुम्ही वरील लेखाचे नाव पाहून संभ्रमात पडला असाल की ही पंच पंच काय भानगड आहे. तर सर्वसाधारण हिमालयातील हिल स्टेशन्स सर्वांना माहीत असतात. आंतर हिमालयातील छोटी छोटी गावे अज्ञात असतात. त्यांची थोडीफार ओळख करुन द्यायचा मी प्रयत्न करणार आहे.


1) पंच कैलास – कैलास मानस सरोवर, आदिकैलास, मणी महेश, श्री खंड कैलास, किन्नौर कैलास.


2) पंच केदार – केदारनाथ, मध्यमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर.


3) पंच बद्री – बद्रीनाथ, भविष्य बद्री, योगध्यान बद्री, वृद्ध बद्री, आदिबद्री.


4) पंच प्रयाग – देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग.

हिमालयात मोठमोठ्या नद्या आहेत व त्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो अशी ठिकाणेही पवित्र मानली जातात. त्यांना प्रयाग म्हणतात. वरील पाच प्रमुख प्रयाग आहेत.

मला सांगायला अतिशय आनंद होतो की ईश्वरकृपेने माझे वरील सर्व पंच पंच ठिकाणांचे दर्शन झाले आहे.

या लेखामध्ये मी पंच कैलासांची ओळख करुन देणार आहे. या सर्व कैलासांचे लांबूनच दर्शन घ्यावे लागते.


1) कैलास मानस सरोवर – पवित्र तीर्थक्षेत्र कैलास मानस. येथील अद्भुतरम्य, विस्मयकारक, खडतर, साहसी यात्रा मी भारत सरकारतर्फे २००२ साली यशस्वीरित्या पूर्ण केली. ही खडतर यात्रा सहज करता येण्यासारखी नाही. त्यासाठी लागते तन्दुरुस्त आरोग्य आणि भोलेनाथाचा बुलावा.

हे ठिकाण तिबेटमध्ये चीनच्या हद्दीत आहे. याचा उल्लेख वेदकाळापासून असून रामायण, महाभारतातही आहे. कैलास पर्वत ६६९० मीटर उंचीवर असून त्याचा आकार साक्षात पिंडीसारखा आहे व तो पवित्र असल्यामुळे त्याच्यावर चढाई केली जात नाही. कैलास परिक्रमा ५२ कि. मी. असून ती तीन दिवसात पूर्ण करतात. पायी किंवा घोड्यावरुन परिक्रमा करताना ‘डोल्मापास’ म्हणून पार्वतीचे ठिकाण आहे. उंची १९५०० फूट. इथे पूजा करतात. इथे खाली गौरीकुंड आहे. कैलास पर्वताची अंतरपरिक्रमा पण केली जाते. पण ती अतिशय अवघड आहे.

याच कैलासाच्या पायथ्याशी ४५५० मीटर उंचीवर मानस सरोवर आहे. याचीही परिक्रमा केली जाते. पूर्वी ही परिक्रमा पायी करावयाचे. पण आता ती बसमधून केली जाते. हे ३२० चौ. कि. पसरले असून याचे पाणी गोड आहे. चमचमणारे, नितांत सुंदर, स्फटीकाप्रमाणे स्वच्छ व अतिशय थंड आहे. येथे यक्ष, किन्नर, गंधर्व स्नान करण्यास येतात अशी मान्यता आहे. याच्या जवळच राक्षसताल म्हणून दुसरे सरोवर आहे. ते जरा खालच्या बाजूला आहे त्यामुळे मानस सरोवराचे पाणी येथे वाहून येते. परंतु हे सरोवर पवित्र मानले जात नाही.

कैलास मानस सरोवरासाठी तिबेटमधून ल्हासा येथून, सिक्कीम येथून नथुला पास मार्गे, उत्तराखंडातील लिपूलेख खिंडीतून (भारतीय सरकार, परदेश विभाग) जाता येते.

पंच कैलास पैकी अत्यंत पवित्र मानलेले हे ठिकाण नितांत सुंदर तर आहेच पण मनःशान्ती देणारेही आहे. आपण येथे निसर्गाच्या भव्य दिव्य स्वरुपाशी तादात्म्य पावतो.

जून ते सप्टेंबर या कालावधीतच येथे जाता येते.



2) आदि कैलास – पंच कैलासपैकी हे दुसरे ठिकाण असून पिथोरागड जिल्ह्यात (उत्तरखंड) येते. या ठिकाणी जाण्याचा मार्ग व कैलास मानसला लिपूलेख खिंडीपर्यंत जाण्याचा मार्ग एकच आहे. आपण घारचुला या ठिकाणाहून निघून गाला, बुधी, माल्या, गुंजी कुट्टी, जॉलीकॉंग अशी ७० कि. मी. पदयात्रा करत आदि कैलासला पोहोचतो. गुंजीवरून दुसरा रस्ता कालापानी, नाबिंडांग, ॐ पर्वताला पोहोचतो.

हा रस्ता म्हणजे चारी बाजूला अगदी जवळून वेढणारे हिरवेगार डोंगर, खळाळत वाहणारी भयंकर ‘काली’ नदी. त्या उंचचउंच पर्वतांच्या दूरवर पसरलेल्या रांगा, हे निसर्गाचे रूप पाहून आपण म्हणजे किती छोटे अगदी मुंगीगत वाटतो. या उंचीकडे पाहतांना असे वाटते की माणसाने मनची उंचीही वाढविली पाहिजे. हे निसर्गापासून शिकायचे. गप्प, शांत राहून हे रुप न्याहाळावेसे वाटते. कमाल वाटते या भव्य दिव्य निसर्गाची आणि मानवाची सुद्धा. कारण या कठीणतम निसर्गापर्यंत पोहोचायला आपल्या बुद्धीचे कौशल्य पणाला लावून किती रस्ते, किती सोयी केल्या आहेत आणि अजूनही करीत आहेच. नाबिडांगला समोरच्या पर्वतावर बर्फाचा ॐ चा आकार दिसतो. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे. सर्व डोंगरांच्या मध्ये ॐ या आकारात बर्फ दिसते. याचे दर्शन होणे निसर्गावर, तेथील वातावरणावर अवलंबून असते. कारण हा बरेच वेळा धुक्याने झाकलेला असतो. पण हाही निसर्गाचा चमत्कार पहायला मिळाला. एकीकडे सूर्य उगवत होता, त्याच्या प्रकाशात सर्व डोंगरावर सोने लखलखल्याचा भास होता, तर दुसऱ्या बाजूने चंद्रमा आपले अस्तित्व दाखवत होता. स्वर्ग स्वर्ग याच्यापेक्षा काही वेगळा असू शकतो काॽ किती तरी वेळ स्तब्ध होऊन निसर्गाचा अविष्कार पहात होतो. हे कधी संपूच नये असे वाटत होते.


3) मणि महेश – मणि महेश हे पंच कैलासचे ठिकाण हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात येते. या ठिकाणी मात्र २ वेळा जाण्याचा योग आला. ऑगस्ट २००७ व जुलै २००८ मध्ये. याची उंची १३५०० फूट आहे. इथेही गौरीकुंड आहे. येथे जाण्यासाठी मुंबई-चक्कीबॅक रेल्वेने प्रवास करावा लागतो. पुढे भारमोर-हडसरपर्यंत जीपने जाता येते. या गावापासून २ दिवसांची ही यात्रा आहे. अंतर २० कि.मी. आहे. सर्वसामान्यपणे गौरीकुंडात स्नान करून पूजापाठ करतात. रात्री मुक्काम करतात. समोर दिसणाऱ्या पर्वतावर एके ठिकाणी नैसर्गिकरित्या खाच आहे. तेथे १२ महिने बर्फ असतो. सकाळी सूर्य उगवल्यावर या खाचेतील बर्फावर सूर्यप्रकाश पडतो व तो मण्याप्रमाणे चमकतो. हे दृश्य अत्यंत मनोहारी दिसते. म्हणूनच या पर्वताला ‘मणि महेश’ म्हणतात. तसेच रात्रीच्या वेळी सुद्धा चंद्रप्रकाशात बर्फ चमकतांना सुंदर दिसते.

मणि महेशचा रस्ता म्हणजे खडा चढ आहे. मध्ये सपाट जागा अजिबात नाही. परंतु या संपूर्ण मार्गात नयनरम्य धबधबे, पुष्पदऱ्या आहेत. ते पाहून आनंद मिळतो. जी मनःशान्ती मिळते ती अवर्णनीयच आहे. ‘मणि-महेश’च्या दर्शनाने सर्व शीण निघून जातो आणि आपण नविन ऊर्जा घेऊन परत येतो. ‘मणि-महेश’च्या पुढे घर बांधले (म्हणजे एकावर एक दगड रचून ठेवायचे) म्हणजे आपली घर बांधायची इच्छा पुरी होते अशी एक भावना आहे. आम्ही अशी रचलेल्या दगडांची खूप घरे पाहिली तेथे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा केली जाते.


4) श्री खंड कैलास – हा कैलासही हिमाचल प्रदेशात असून १८५०० फूट उंचीवर आहे. हिमाचलमधील रामपूर या मोठ्या गावातून ‘ज्यांव’ या गावासाठी १५ कि.मी. बस∕जीपने जाऊन तेथून पायी जावे लागते. श्याचडू, भीमबाग, पार्वती बाग, नयन सरोवर, श्री खंड कैलास असा ३५ कि. मी. चा हा मार्ग आहे. या मार्गात प्रचंड ग्लेशियर आहेत. चढाई, उतराई करत बारीक दगड गोटे, मोठे खडक आहेत. हा मार्ग अतिशय कठीण आहे. खडतर आहे. त्यामुळे येथे बहुतांशी स्थानिक लोकच जातात.

येथे राहण्याची सोय नाही. हे ठिकाण कायम बर्फाच्छादित असते. एक ७५ फूट उंच शिला असून त्याला श्री खंड कैलास म्हणतात. त्या शिळेला मधोमध मोठी चीर आहे त्यामुळे त्या शिळेचे दोन भाग दिसतात म्हणून त्याला श्री खंड कैलास असे म्हणतात.

वरील पाच दिवसांचा ट्रेक अतिशय खडतर आहे. त्यामुळे तो आम्हाला झेपणार नाही म्हणून आम्ही श्री खंड कैलासचे दर्शन सरहान गावातून (सिमल्यापासून अंदाजे ७५- ८० कि. मी.) घेतले. साधारण एरिअल अंतर ३५-४० कि.मी. दूर ढगात लपलेल्या श्री खंड कैलासचे दर्शन ऑगस्ट २००७ मध्ये नाही झाले. म्हणून २०१० च्या मार्चमध्ये आम्ही परत सरहानला गेलो व अक्षरशः दिवसभर त्याने प्रसन्न होऊन आम्हाला दर्शन दिले. गुरुपौर्णिमेच्या वेळी याची यात्रा असते.

5) किन्नौर कैलास – उंची ६०५० मीटर. हा पाचवा कैलास पण हिमाचल प्रदेशात असून याची यात्रा पण ७-८ दिवसांत करता येते. ७९ फूट उंच अशी शिला असून मार्ग अतिशय कठीण आहे. या कैलासाला परिक्रमा करायची असल्यास सिमला-सरहान-पौबारी हा बस प्रवास करून नंतर पूर्वनी-रिब्बा-थांगी-लंबर-चरंग-चिटकूल या गावांतून पर्वताच्या सर्व बाजूंनी परिक्रमा करतात. एकूण ७५ कि.मी. पायी यात्रा करावी लागते. ही यात्रा अतिशय अवघड असून विशेष सुविधा कीट घेऊन टेंट, जेवणखाण्याची व्यवस्था, पोर्टर, गाईड घेऊनच करावी लागते. तंदुरुस्त शरीर प्रकृती व धैर्य असणारेच लोक ही यात्रा करतात.

किन्नौर कैलास चे दूरवरुन दर्शन ‘कल्पा’ या गावातून होते. (एरियल अंतर ४०-५०कि.मी.) आम्ही दुरुनच या कैलासाचे दर्शन घेतले. ऑगस्ट २००७, मार्च २०१० असे दोन वेळा दर्शन घ्यायचा योग आला.

कैलास मानस यात्रेत २००२ साली पंचकैलास यात्रा करावयाची इच्छा मार्च २०१० साली सफल संपूर्ण झाली.

॥ॐ नमः शिवाय॥

Meenal Velankar


No comments:

Post a Comment