Friday, 26 June 2020

संवाद आपुला आपलाशी.

साधारण फेब्रुवारीच्या अखेरीपासून वेगवेगळ्या समस्यांनी संपूर्ण जगालाच खरे तर मानवाने आत्तापर्यंत जे जे साध्य केले आहे त्याने खरेच काय साध्य झाले याचा विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसे तर जेव्हापासून आतंकी कारवाया वाढलेल्या दिसू लागल्या, त्सुनामी, भूजचा भूकंप, विविध ठिकाणी आलेले पूर या आपदा आल्या तेव्हाच खरा इशारा आपल्याला मिळालेला होता. पण ते संकट थेट आपल्याशी येऊन भिडत नव्हते. काही जणांपुरतेच थोड्या थोड्या काळाने आक्रमण करीत होते. आता मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की येणारे संकट कधी आपल्या अंगावर धडकेल याचा कुणालाच अंदाजही करता येत नाही. मग ते करोनाच्या रुपात येईल, अभिनेत्यांना आलेल्या अचानक मृत्यूच्या रुपात येईलॽ महायुद्धाच्या रुपाने की निसर्गासारखा स्वतःचाच स्वतः संहार करुन घेण्याच्या रुपात येईलॽ कोण जाणे!

खरेच अशी अगतिकता येण्याचे कारण आपल्याच मानवाच्या कृतीत आहे. आपल्यालाच आपले वर्तन बदलणे भाग आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला मान्य असो की नसो निसर्गाची जेवढी हानी आपण केली आहे ती भरुन काढण्याचे काम प्राधान्याने करायला हवे आहे. त्यासाठी आपल्या आवडीला मुरड घालावी लागणार आहे. फाजील स्वातंत्र्याचा हव्यास सोडावा लागणार आहे. पुरेसे अन्न वस्त्र तर हवेच. पण अतिरेकी संग्रह करण्याची वृत्ती बाजूला ठेवावी लागणार आहे. फुकट मिळणाऱ्या गोष्टींचा लोभ सोडावा लागणार आहे. कष्टाची तयारी करायला लागणार आहे. 

हो हो हे सगळे खरे आहे पण करणार कसे आणि कोणॽ हाच कळीचा मुद्दा आहे. जनता वाट पहातेय सरकार करेल म्हणून. सरकार म्हणतेय हे जनतेनेच करायला हवेय. काही भाबडी माणसे या आशेवर आहेत की तो जगन्नियंता राम, कृष्णासारखा अवतार घेईल आणि संकटाचे निवारण करील. पण खरेच असे दुसरे कोणीतरी येऊन संकट निवारण करते काॽ विचार केला की कळते नाही आपलाच आपल्याला यातून बाहेर पडायचा मार्ग नुसता शोधायचा नसतो तर त्या मार्गावर चालायचे असते. स्वतःचा धर्म म्हणजे जो जन्म मिळाला आहे त्या ठिकाणी माझे काय कर्तव्य आहे याची जाण असायला हवी. त्याचबरोबर ज्या समाजात आहोत त्या समाजाबद्दलची आस्था हवी आणि ज्या राष्ट्राचे, धर्माचे आहोत त्याची संस्कृती ज्ञात व्हायला हवी. 

सध्याच्या काळात इतक्या निराशाजनक, उद्वेगजनक घटना कानावर येतात की अभ्यासाने समजलेल्या वरील गोष्टींवरचा विश्वास टिकत नाही. अशा वेळी जेव्हा मैसूरची एकादी कमलम्मा आपल्या परिसरात रोटरीतर्फे अनेकांना अन्नदान करीत असलेले पाहून आपल्याला संजय निराधार योजनेतली ६०० रु मिळाल्यापैकी ५०० रु. त्यांना आग्रहपूर्वक देते. एकादा आपल्या गावात शहरातून येणाऱ्या लोकांना कोरोनामुळे अलगीकरणासाठी गावकऱ्यांच्या सहाय्याने गावाबाहेर एकादी कुटी बनवतो. दोन नागरिक आपल्या गावात अलगीकरणामुळे शाळेत रहावे लागल्यानंतर त्या शाळेची पूर्ण स्वच्छता करतात. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदून ठेवतात. कुणी एकादा शेणमातीत बिया मिसळून त्यांचे (सीडबॉल्सचे) वाटप करतो तेव्हा खरेच दिलासा वाटतो. अशांची संख्या जसजशी वाढेल तसतशी ईश्वरी शक्त्ती प्रकट होईलच होईल. 

वटपौर्णिमेनंतर खरे तर पंढरीच्या वाटेवर लाखो वारकरी चालू लागले असते. पण आजच्या परिस्थितीत त्यावर निर्बंध आल्यानंतर काय आणि कसे स्वरुप घेतील ही मंडळी असे वाटत होते. पण आज मात्र खात्री पटली की एकही त्या वाटेने पायाने चालत निघाला नाही. मात्र त्यांची वारीची परंपरा त्यांनी  ‘ठायीच बैसोनि करावा विचार’ यानुसार अंमलात आणली आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या जागी नित्यक्रम करीत असतांना मनाने मात्र ती वाट चालत आहे. त्या प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठल यंदा त्याच्याच स्थानी नक्की दर्शन देणार. 

आपल्या प्रत्येकालाच आपली जबाबदारी समजून उचित ते कार्य समर्थपणे करण्याची बुद्धी मिळो. त्या मार्गावर चालण्याची दृढ श्रद्धा असो आणि त्यासाठी आवश्यक ते बळ प्राप्त होवो. 

Padma Dabke

1 comment: