मी बारमध्ये शिरलो तेव्हा तो नेहेमीच्याच ठिकाणी बसलेला होता. मी येताक्षणी मला आपादमस्तक न्याहाळत, अत्यंत काळजीच्या सुरात त्याने विचारले, ' ती कोटाची बटणे मुद्दाम सोडलीयस का? '
'अरे ,मला काय वेडबीड लागलं आहे का असं करायला ? ट्रेनच्या गर्दीत निघाली असतील ', मी म्हणालो.
हं!, तसं असेल तर उत्तम. नाहीतर जिवावर बेतायचं रे, तो म्हणाला.
"आं ! हे काय भलतंच? उगाचच आवडतं म्हणून कोटाची बटणंबिटणं सोडून ठेवणाऱ्यातला नाही बरं मी", मी म्हणालो.
असो !!
ऐक ना, माझा एक मित्र आहे, विचित्रच आहे जरासा ,माझ्यासाठी एक ड्रिंकची ऑर्डर देता देता तो म्हणाला .त्याला ना डावं उजवं समतोलपणाचं अगदी वेड आहे..वेड. वस्तूच्या दोन्ही बाजू अगदी सारख्या असल्या पाहिजेत असा त्याचा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ त्याचं घरच घे .त्याने ते मोठ्या औरसचौरस म्हणजे ..अगदी चौरस असलेल्या जागेवर अगदी मधोमध असं बांधलं आहे. बाहेरचं प्रवेशद्वार म्हणू नकोस, घराचं मुख्य दार म्हणू नकोस, सगळी दारं दोन फळ्यांची .नावाच्या पाट्या सुद्धा तीन ,त्यापैकी दोन दरवाज्याच्या दोन्ही बाजूना लावलेल्या, आणि तिसरी मुख्य दरवाज्याच्या अगदीं मघोमध लावलेली. दारातून आत शिरलं की दोन्ही बाजूला अगदी तंतोतंत सारखी अशी चप्पल बूट ठेवण्याची कपाटे, आतील वस्तू पण अगदीं सारख्या असाव्यात म्हणून तो नेहेमी चप्पल बुटाच्या दोन दोन जोड्या घेत असतो.
अजून एक गम्मत म्हणजे सर्व बूट बिनानाडीचे बरंका.
का बरं ?न समजल्याने मी विचारले.
अरे, कितीही कौशल्याने नाड्या बांधल्या तरी डाव्या आणि उजव्या बुटाच्या नाडीमध्ये फरक दिसतो ना म्हणूनच.
बरं, घराच्या आतील बाजूस प्रवेश केला तर तिथेही अजूनच बुचकळ्यात पडायला होतं, तो पुढे म्हणाला. व्हरांड्यातून चालत पुढे गेलो तर भिंतींवर चित्रे लावलेली आहेत, दोन्ही बाजूंना अगदी सारखी. घरातील प्रत्येक वस्तुबाबत हा सारखेपणा, दारात उभं राहून पाहिलं तर तंतोतंत समतोल, सारखेपणा जाणवणारा.
'अज्जिबात खरं वाटत नाही हे !' मी म्हणालो.
अगदी खरं आहे रे हे, मी माझ्या डोळ्यांनी समक्ष बघितलंय. ते पाहून मला तर चक्करल्यासारखंच झालं रे! कुठल्यातरी एक बाजूला आरसा तर नाही ना लावलेला याची कितीतरी वेळा खात्री करून घेतली मी.
मित्रा, पण मला सांग, याचा आणि कोटाच्या बटणाचा काय संबंध?
वेडाच आहेस अगदी, लक्षात नाही आलं का तुझ्या?अरे, जर कोटाची बटणं लावली तर डावी उजवी बाजू सारखी न दिसता डावा उजवा समतोलपणा रहात नाही. हो की नाही?आणि म्हणूनच माझा तो मित्र बिना बटणाचा कोट शिवून घ्यायचा.
ही तर वेडगळपणाची कमालच झाली म्हणायची .
हो ना! लोक टरच उडवतात अशांची!! तरी बरं, पुरुषांच्या कपड्यात हा सारखेपणा सांभाळता येतो. नेकटाय, खिसे वगैरे वगैरे. मनगटी घड्याळे पण दोन्ही हातात, फक्त सदऱ्याच्या बाहीच्या आत लपल्यामुळे लोकांच्या नजरेस पडत नाहीत एवढंच. राहता राहिला चष्मा, त्या बाबत सुद्धा हा समतोल राखता येतो, सुदैवाने त्याचा दोनही डोळ्यांचा नंबर पण सारखाच होता म्हणून बरं! आता यावर काय बोलावे पुढे हे न कळल्याने मी जरा गप्प बसलो आणि मग विचारले, ' हे जीवावर बेतायचं रे ! असं काहीसं तू म्हणालास ना मगाशी? ते का बरं?
हो हो ! तसेच म्हणालो मी, तो उत्तरला व पुढे बोलू लागला.
तो नेहमीच केसांचा भांग अगदी मधोमध पाडायचा. एके दिवशी आरश्यात पहात असताना त्याच्या लक्षात आलं की दोन्ही बाजूंच्या केसांच्या लांबीत थोडासा फरक आहे. झालं! त्यानं कात्री घेतली अन् लांब असलेले केस कापले. परंतु थोडेसे जास्त कापले गेल्यामुळे दुसऱ्या बाजूचे केस थोडे कापले असं करता करता .............
"काहीही झालं तरी तु तुझ्या केसांना हात लावू नकोस हं" अशी खबरदारीची सूचना मी त्याला वारंवार दिली होती तरीही ........ असं म्हणून त्यानं हताशपणे मान हलवली .
काय झालं रे मग ? मी उत्सुकतेने विचारले .
काय होणार रे अजून? मेला बिचारा ,तो दुःखित अंतःकरणाने म्हणाला .
काय सांगतोस? कसं ? काय झालं रे ?असं मी विचारले .
अरे ,एकदा ही बाजू, मग दुसरी बाजू असं करता करता डोक्यावरचे सगळे केस कापून झाले आणि मग काय! येतंय का लक्षात तुझ्या? तो म्हणाला .
अरे पण टक्कलाचा आणि मरणाचा काय संबंध?सर्दी वगैरे झाली का त्याला त्यामुळे?
नाही रे, असं कसं लक्षात येत नाहीये तुझ्या? माणसाच्या डोक्याच्या आकारात डावाउजवा सारखेपणा असतो असं तुला वाटतं का? कुठेतरी काहीतरी फरक, असमतोल असतोच ना?
सुस्कारा टाकत तो म्हणाला,
हातातल्या हातोडीनं तो असमतोलपणा घालवायचा प्रयत्न केला आणि ...........
--
आकागावा जिरो
आकागावा जिरो यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1948 रोजी जपान मधील फुकुओका येथे झाला.1976 मध्ये,' Ghost Train ' ही त्यांची पहिली विनोदी गूढकथा प्रसिद्ध झाली. जॅपनीज लिटररी पब्लिकेशन तर्फे, नवोदित गूढकथा लेखकाला देण्यात येणारे पारितोषिक त्यांच्या या कथेला मिळाले.इथून सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास गेली चाळीस वर्षे अव्याहत सुरु आहे. जिरो यांनी गूढशैलीतील रहस्यकथा,थरारक चातुर्य कथा, भयकथा हे लेखनप्रकार हाताळले. दोन गूढ कादंबऱ्या,निवडक लघुकथांचे 14 संग्रह, निबंध लेखन या उदंड लेखनाबरोबरच, Calico Cat Holmes Series या लेखनाने आजतागायत वाचकांवर मोहिनी घातली आहे.त्याच्या लेखनावर आधारित असे अनेक चित्रपट, नाट्यमालिका,तसेच अॅनिमेशनपटही केले गेले आहेत. लेखनाचा दर्जा कायम ठेवून अविरत लेखन करणाऱ्या या लेखकालाअनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच 2006 मध्ये त्यांना "जीवनगौरव "पुरस्काराने भूषविण्यात आले. झपाटल्यासारखं लेखन करणारे आकागव जिरो हे जपानमधील यशस्वी आणि तितकेच लोकप्रिय लेखक आहेत.
By
Shaama Chajed
No comments:
Post a Comment