"घरटं " म्हटलं की सुगरणीचा खोपा, शिंप्यानी सुबकपणाने पाने शिवून तयार केलेले, तर काही माती लिंपून केलेली, अशी अनेक प्रकारची घरटी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण अगदीं साधी अशी गोष्टींतली काऊ चिऊची येत नाहीत. का बरे? ती सुंदर नसतात म्हणून? घरटे कसेही असो, ते बनविताना, बांधताना पक्ष्यांच्या भावना सारख्याच असतील, नाही का ? (पक्षी तज्ञ हा मुद्दा खोडून काढतील कदाचित)*
लॉकडाऊनच्या निमित्ताने असंच एक घरटं तयार होताना अनुभवायला मिळालं. एरवी एवढा वेळ कुठे काढतो आपण आपल्या सो कॉल्ड धकाधकीच्या आयुष्यात?
माझ्या घराला दोन गच्च्या आहेत, झाडंही आहेत बरीच. एक गच्ची तर किचनलाच लागून आहे, त्यामुळे स्वयंपाक करता करता तिथल्या झाडांवर येणारे बुलबुल, सनबर्ड, शिंपी असे बरेच पक्षी बघायला खूप मजा येते. संध्याकाळी झोपाळ्यावर बसलं की ठराविक वेळ झाली की आपापल्या घरी परतणारे पक्षी पाहतानाही मस्त वाटतं.
हे असं बघत असताना एक कावळा वारंवार घिरट्या घालताना दिसायचा, कावळा असल्याने त्याला लगेचच हाकलून द्यायचो आम्ही. तरीही तो यायचाच. एक दिवस पोळ्या करताना दिसलं की मधुमालतीला आधारासाठी बांधलेल्या प्लास्टिकच्या दोरीची गाठ, चोचीने सोडवण्याचा प्रयत्न करतोय तो. अगदी बारीक अशी ती दोरी त्याच्या काक दृष्टीला दिसली होती (उगाचच हा शब्द आला नसेल आपल्या भाषेत) त्याला काही ते जमेना. सहजच रस्त्याच्या कडेच्या झाडावर नजर गेली तर तिथे एक घरटं आकाराला येताना दिसलं, कावळाही होताच तिथे. दोरी घ्यायला आला होता तोच असावा असं आपलं आम्हाला वाटलं . मग आम्ही त्या झाडाच्या जवळच दोऱ्यांचे काही तुकडे ठेवले आणि वाट बघत बसलो तो (का ती?) येण्याची. बराच वेळ झाला तरी काही तो आला नाही, आम्ही पण नाद सोडून दुसऱ्या कामांना लागलो. पण थोड्या वेळाने बघतो तर काय? सर्व दोऱ्या गायब. नेल्या होत्या त्यांनी. हळू हळु त्याचा धीटपणा वाढायला लागला. मी लिंबाच्या काटक्या तोडून ठेवल्या होत्या, त्यातील त्याच्या घराला योग्य वाटल्या त्या काड्या पण नेल्या त्यांनी. हा उद्योग ३/४ दिवस सुरू होता आणि एव्हाना आम्हालाही गंमत वाटू लागली होती. झाडावरचं घरटं आकाराला येताना दिसत होतं, एक वेगळंच समाधानही वाटत होतं.
बाईंडींग वायरचं एक छोटं भेंडोळ होतं त्या गच्चीत, त्यावर त्याची नजर पडली. त्याला ते उपयोगी असावं कदाचित, कारण ते नेण्यासाठी त्याची खटपट सुरू होती. जड असल्याने ते काही उचलता येईना, आणि सोडवताही येईना. हे संतोषच्या लक्षात आलं तसं त्यानी ते थोडंसं सोडवून, त्याला उचलून नेता येईल अशा ठिकाणी ठेवलं. एक दोन तासांनी चक्कर मारली गच्चीत तर भेंडोळ गेलं होतं घरट्यात. वाळक्या काड्या काटक्या दोऱ्या वायर अशा टोचणाऱ्या गोष्टींपासून बनलेलं घरटं, कमाल आहे नाही? मऊ अशी कुठलीच वस्तू त्यांनी नेली नव्हती आत्तापर्यंत, अर्थात दुसरीकडून कुठून नेली असेल तर माहीत नाही. किंवा त्यांना तशी गरजही नसेल
असाच विचार करत होते तेव्हा लक्षात आलं की तो मधुमालतीच्या झाडाजवळ परत येतोय, म्हटलं बघूया तरी काय करतोय? सतत काही लक्ष ठेवता येत नव्हतं, परंतु संध्याकाळी बघितलं तर त्या झाडाची एकूणएक हिरवी पाने त्यांनी नेली होती, जरासं वाईट वाटलं पण लगेच मनात विचार आला की "चला काहीतरी मऊ वस्तू आहे घरट्यात" आणि हुश्श झालं.
आता बहुतेक त्याचं घरटं तयार झालं होतं कारण त्याच्या फेऱ्या थांबल्या होत्या. घरट्यामध्ये आलटून पालटून दोघांपैकी एक जण दिसू लागले, म्हणजे कदाचित अंडी घातली असावीत. कदाचित आता पिल्लं पण झाली असतील.
भले सौंदर्याच्या व्याख्येत बसणारं नसेल ,कसं का असेना एक घर उभं राहताना अनुभवायला मिळालं. ते साकारण्यात आपलाही काहीतरी हातभार लागला याचं एक अनामिक समाधानही मिळालं.
ता. क. :
सध्या शिंपी पक्षाच्या चकरा सुरु आहेत. मॉपच्या कापडाचे मऊ मऊ धागे तोडून नेण्याचं काम जोरात सुरू आहे, त्याचं पांढरं कापड जवळपास दिसेनासे झालं आहे.
शामा छाजेड
No comments:
Post a Comment