Friday, 26 June 2020

नकटीच्या लग्नात १७६० विघ्न

एका टिपिकल चौकोनी कुटुंबात तुम्हाला हे दृश्य नक्की पहावयास मिळेल. संध्याकाळी  ते रात्री ११ वाजेपर्यंत रिमोटचा ताबा घरातील आजी किंवा आईकडेच. चुकूनही चानेल बदललं, तर! कुणी हात लावला टीव्हीला? दिवसभर काम करून जरा कुठे विरंगुळा मिळतोय... लावा माझं चानेल आधी!” ही अशी वाक्ये हमखास ऐकावयास मिळतीलत्यातही जरस्पेशल एपिसोडचा सिलसिला असला, तर टीव्ही नि रिमोट पासून चार हात लांब राहण्यातच शहाणपण.

आमच्या नीला काकूही याच वर्गातल्या. त्यांचं म्हणजे कसं, माझ्या घरातल्यांना शांतता मिळो वा मिळो, अर्जुनच्या आर्येला कुणी सतावलेले मला अजिबात चालणार नाही. आर्या किती सालस, किती गुणवान, किती सुशील! आणि आर्याची सासू नुसती खाष्ट. नीला काकूंची मजा तेव्हा येते जेव्हाधूम-धूम-तानानानाच्या गजरात सासूबाई आर्येला घराबाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते. स्वतःच्या सासूबाई शांत, समंजस, प्रेमळ असूनही काकूंना याचा विसर पडतो नि त्या जगातील सर्वच सासवांना दहा-बारा शिव्या देत आर्येला जणू मानसिक बळ पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतात.

स्त्रियांचे वैशिष्ट्य असते की त्या चटकन एम्पथाइज करु शकतात. पण नीला काकूंची एम्पथी रिअल पेक्षा रील लाईफ पात्रांबद्दल जरा जास्तच दिसते

एकदा काय झालं, नीला काकूंची भाचे-मंडळी सुट्टीत घरी रहायला आली. घरात १०-१२ वर्षांची तीन मुलं. आता मुलं म्हटलं की दंगा-मस्ती आलीच. आणि सुट्टीतील धमाल म्हणजे सारखी लागणारी भूक हे ओघाने आलंच. दिवसभर ही जबाबदारी चोख पार पाडणाऱ्या काकूंचा ताण सायंकाळी सिरीयलच्या वेळी मात्र उच्चांक गाठतो. आज नेमका आर्येच्या मैत्रिणीचा अर्जुनच्या भावाशी विवाहसोहळा होता. एक तासाचा महाएपिसोड! एकीकडे राजू-विशू-विजू ची मस्ती, तर दुसरीकडे आर्येच्या सासूची. झालं. काकूंचा बी.पीवाढण्यातच जमा. आर्या तिथे युक्त्या-क्लृप्त्या लढवत सासूच्या कारस्थानांना ठरवण्यात बिझी, नि नीला काकू टीव्हीचा रिमोट विशू पासून वाचवण्यात बिझी.

काय सांगू तुम्हाला वाचकांनो, त्या नकट्या मुलीच्या खोट्या खोट्या लग्नात आर्येला जितका त्रास झाला नसेल, त्यापेक्षा जास्त समस्यांना आमच्या काकूच सामोऱ्या गेल्या. एका महाएपिसोड साठी १७६० विघ्नांना तोंड दिलं त्यांनी! एकटीने!

 

-कश्मिरा सावंत

 


No comments:

Post a Comment