सुरळीच्या वड्या
साहित्य::
बेसन - १ कप
दही - १ कप
पाणी - २ कप
हिंग - १/४ छोटा चमचा
हळद - १/२ छोटा चमचा
लाल तिखट - १/२ छोटा चमचा
मीठ - १ छोटा चमचा
तेल - १ छोटा चमचा
फोडणीचे साहित्यः
तेल - २ मोठे चमचे
मोहरी - २ छोटे चमचे
तीळ - २ छोटे चमचे
हिंग - १/४ छोटा चमचा
हिरवी मिरची - १ बारीक चिरून
सजावटीचे साहित्यः
ओले खोबरे - १/४ कप
कोथिंबीर - १ मोठा चमचा बारीक चिरून
कृतीः
प्रथम एक कप बेसन घ्यावे. ते चाळणीने चाळावे म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहत नाहीत. आता हे
चाळलेले बेसन घेऊन त्यात दही, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, तेल व थोडे थोडे पाणी घालून निट
मिक्स करून घ्यावे. तुम्ही हे हॅन्ड मिक्सी च्या सहाय्याने किंवा मिक्सरच्या भांड्यात विप मोडलाही करू
शकता.
टीपः जेव्हा मिश्रण शिजून तयार होईल तेव्हा ते पसरवायला तुम्हाला स्टीलची तीन ताटे लागतील.
शिजलेले मिश्रण पसरवायची कृती अत्यंत जलद करावी लागते.
तर आता मिक्स झालेले हे मिश्रण नॉनस्टिक कढई मध्ये ओतून घ्या. गॅसची आच मध्यम ठेवा व मिश्रण
सतत ढवळत रहा त्यामुळे त्याच्यात गुठळ्या होणार नाहीत. पाच ते सात मिनिटात मिश्रणाला उकळी
येईल. त्यानंतर अजून साधारण चार-पाच मिनिटे मिश्रण शिजण्यासाठी लागतील. अर्धा चमचा मिश्रण
ताटा ला लावून बघा. ते सुटून त्याची अलगद गुंडाळी करता येत असेल तर आता मिश्रण शिजले आहे
असे समजावे. गॅस बंद करा.
दोन डाव मिश्रण एका ताटावर उलथन्याने नीट पातळ पसरून घ्या. उरलेले मिश्रण तोपर्यंत झाकून ठेवा.
म्हणजे ते लवकर गार होणार नाही. ही सर्व कृती तुम्हाला अत्यंत जलद करायची आहे. मिश्रण ताटाच्या
एका साईडला घेतलेत तर उलथन्याने पसरवणे तुम्हाला खूप सोपे जाईल. आता बाकीचे मिश्रणही
उरलेल्या दोन ताटांवर असेच पसरून घ्या.
आता छोट्या कढईत थोडे तेल घालून व वर दिलेले साहित्य वापरून फोडणी करून घ्या.
तोपर्यंत ताटावरील मिश्रणही गार होईल.
तयार फोडणी थोडी थोडी सर्व ताटांवर पसरवा.
आता सुरीने सारख्या अंतरावर त्याच्या उभ्या पट्ट्या कापून घ्या.
त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
आता त्याची सुरळी किंवा गुंडाळी करावी.
ही सुरळीची वडी हलकीफुलकी आणि स्वादिष्ट लागते. तसेच ती करण्यासाठी तेलही खूप कमी लागते.
तर नक्की करून पहा सुरळीची वडी.
- सौ. प्राजक्ता भागवत (Cremlingen)
No comments:
Post a Comment