हातात पाकीट घेऊन ‘सावित्री’ ‘शिमा’ कंपनीच्या ऑफिससमोर उभी होती, ‘शिमा’ च्या पाटीकडे पाहात. ‘शिमा’ म्हणजे ‘शिरीष’ आणि ‘माधुरी’. शिरीष सावित्रीच्या वाड्यात राहणारा. बालमित्र नाही म्हणता येणार कारण तिच्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठा होता पण बालओळखीचा. फारशा गप्पा नसायच्या त्यांच्या. त्याची फॅमिली तशी आब राखून राहणा-यातली होती. वाड्यातले बाकी सगळे कनिष्ठ मध्यमवर्गीय. वेड्यावाकड्या, कशाही बांधलेल्या, जुनाट, अंधा-या खोल्यांच्या त्या वाड्यात शिरीषचं घर मात्र व्यवस्थित रंग दिलेलं, फर्निचर असणारं, पुढच्या बाजूला असल्यामुळे नीट उजेड असलेलं होतं. सावित्री त्यांच्या घरी एक-दोनदाच गेली असेल. पण तिथलं फर्निचर – पुस्तकांचं कपाट, टेबलखुर्ची, पेनस्टँड, डाय-या, पंचिंग, स्टेपलर, डिंक, कागद अशी सगळी स्टेशनरी नीट ठेवलेली, स्वयंपाकघरात सुबक मांडणीत भांडी नीट लावलेली, डायनिंग टेबल, ती सगळं थक्क होऊन बघतच राहिली होती. वास्तविक सावित्रीच्या घरचे त्या वाड्याचे मालक होते. पण त्यांच्या जगण्यात कुठलाही नीटनेटकेपणा नव्हता. कुठल्या खोल्या आपल्याकडे ठेवायच्या, कुठल्या भाडेकरूंना द्यायच्या याविषयी कुठलंही व्यावसायिक गणित नव्हतं. आणि भाडं तरी किती, दहा – दहा, वीस – वीस रू. शिरीषची आई सावित्रीच्या आजीला भाडं द्यायला यायची. सुंदर साडी, सुरेखसा अंबाडा, त्यावर गजरा अशी. आजीनं मांडलेल्या पाटावर नाजूकपणे बसायची. आजी स्टोव्हला पंप मारत त्यावर आदल्या दिवशीचं वरण उकळत बसलेली असायची. वरणासारखा पदार्थ दररोज उकळून उकळून आठ दिवससुद्धा वापरायला तिला काऽही वाटायचं नाही. वरण उतरवून ती शिरीषच्या आईसाठी कॉफी ठेवायची. पाण्यात भरपूर साखर आणि कॉफीच्या वड्या टाकायच्या. त्या वड्या सुट्या होऊन त्यांचे कण एकमेकांपासून सुटे सुटे होईपर्यंत बघत राहायला सावित्रीला फार आवडायचं. सगळे कण विखुरले की घरभर कॉफीचा वास सुटायचा. आजी मग त्यात दोन-तीन चमचे दूध टाकायची. ती काळसर कॉफी गाळून शिरीषच्या आईला द्यायची. कॉफी घेता घेता शिरीषच्या आई, आजी एवढ्या चार मजली वाड्याची देखभाल कशी करते, या वयात किती वेळा जिने चढउतार करते, आजोबांच्या पूजेसाठी किती तयारी करते या सगळ्या गोष्टींचं कौतुक करायची. आजोबांच्या पूजेची वेळ म्हणजे वरणाला स्टोव्हच्या तोंडी द्यायची वेळ. वरण बारीक वातीच्या स्टोव्हवर ठेवून आजी खाली पूजेच्या तयारीला निघून जायची ती देवपूजेची भांडी घासून, देवघरातली फरशी पुसून, पूजेसाठी पाणी, नैवेद्य, दूध वगैरे ठेवून तासाभराने वर यायची. तोवर वरण उकळत पडलेलं असायचं. कधी कधी तर ती अशी दूध पण ठेवून जायची. दोन – तीन लिटर दूध तापायला वेळ लागायचाच पण वर आलं तरी सत्राजण जिन्यावरनं ये – जा करणारे येता - जाताना पाहायचे आणि खुशाल आत जाऊन वर येणारे दूध उतरवून फुंकर मारून स्टोव्ह विझवून टाकायचे. असं झालेलं आजीच्या लक्षात पण यायचं नाही. ती समजायची, आपणच दूध उतरवलं. अशी आजी असूनही शिरीषच्या आई कौतुक करायच्या. हे सगळं सावित्रीच्या लहानपणचं. शिक्षणासाठी आठदहा वर्षं इकडे तिकडे राहून सावित्री गावी परतली तेव्हा तिने शिरीषला ओळखलंच नाही. अर्ध्या चड्डीतल्या शिरीषला आता मिश्या होत्या. ‘‘अरे बापरे, किती मोठा झाला.’’ ‘तू’ म्हणताना तिची जीभ अडखळली. तिने तो शब्द गिळून टाकला. त्यानंतर तिला शिरीषशी कधीच एकेरी बोलता आलं नाही. तो बालओळखीचासुद्धा वाटेना. मात्र तरुण सावित्री शिरीषच्या नजरेत भरली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तेही तिच्या आजीकडे. आजी फारच खूष झाली. कारण शिरीषचं घर म्हणजे त्यांना आदर्श! शिरीषचं घरचं सगळं चांगलंच होतं. शिरीषने घरबांधणी व्यवसायाला नुकतीच सुरुवात केली होती. ‘पैसे मिळवील नक्की’ हे त्याला पहिल्यांदा भेटणारासुद्धा सांगू शकला असता इतका तो व्यावसायिक वृत्तीचा होता. पण सावित्री नाही म्हणाली. तिचं अरूशी तोवर ठरलंही होतं. झालं! शिरीषचं माधुरीशी लग्न झालं. त्याच्या कंपनीचं नाव ‘शिमा’ झालं. शिरीष आणि सावित्री आपापल्या संसारात सुखी झाले. अधूनमधून शिरीषची भेट व्हायची. अतोनात औपचारिक भेटी सावित्रीला असह्य व्हायच्या. पण तिच्या दृष्टीने तो तिला मागणी घालणारा पुरुष असल्याने आता त्याच्याशी औपचारिक संबंध असणेच इष्ट होते. आज तिच्या काकांनी त्यांचं एक पाकीट शिरीषला द्यायला सांगितलं होतं. तेही ती त्याच भागात जाणार होती म्हणून. तिच्या नव-याला ते फारसं आवडलं नाही पण काकांसमोर आपण काही बोललो तर वाईट दिसेल म्हणून तो गप्प बसला. सावित्रीने शिरीषच्या ऑफिसात प्रवेश केला. तिच्याकडे प्रश्नार्थक चेह-याने पाहणा-या रिसेप्शनिस्टपाशी जाऊन आपलं नाव सांगितलं. शिरीषला भेटायचं असल्याचं सांगितलं. रिसेप्शनिस्ट आत जाऊन सांगून आली. सावित्रीला आत जायची खूण केली. केबिनचं दार ढकलून ती आत गेली. समोरच्या खुर्चीत शिरीष बसला होता. समोर त्याची सेक्रेटरी डिक्टेशन घेत होती. ‘‘ये ये’’ शिरीष म्हणाला. सावित्री समोरच्या खुर्चीत बसली. ‘‘मी जरा हे पत्र पूर्ण करतो हं’’ ‘‘हो हो’’ त्याने वाक्यरचनेला सुरुवात करताक्षणीच त्याला सावित्रीचा अडथळा जाणवला. मग तो म्हणाला, ‘‘जाऊ दे. माझं हे खूप वेळ चालेल. आपण नंतर लिहूया ग.’’ मग सावित्रीला, ‘‘हं, काय म्हणतेस?’’ ‘‘काही नाही. हे काकांचं पाकीट द्यायचं होतं.’’ ‘‘बरं बरं’’ एकाएकी त्याने विचारलं, ‘‘ए, पम्या कुठेय ग सध्या?’’ सावित्री दचकली. पम्या तिचा सख्खा धाकटा भाऊ. आजीच्या लाडामुळे बिघडलेला. लहान वयातच व्यसनं लागलेला. शिरीषला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं, पम्या कुठेय न कसाय, सावित्रीपेक्षाही जास्त कारण पम्या शिरीषच्या जवळच होता राहायला, सावित्रीपेक्षाही. मग शिरीषने हे का विचारावं? नकार देणा-या सावित्रीला खिंडीत गाठण्याची रणनीती होती का ही? ‘‘पम्या ना? इथेच आहे की’’ स्वतःला सावरत सावित्री म्हणाली. ‘‘बराय का?’’ ‘‘हो’’. अजूनही शिरीषचं समाधान होत नव्हतं. सावित्रीचा पडलेला चेहरा आणखी पडायला हवा होता. ‘‘नाही म्हणजे, चालूच आहे का?’’ हाताने अंगठा तोंडाकडे नेण्याची खूण. ‘‘ते काय बंद होणार?’’ सावित्री संयमाने म्हणाली. ‘‘ते मधे काय, कसलं औषध चालू केलं होतं त्याचा काही नाही ना उपयोग झाला?’’ अतोनात औपचारिकतेत ही कसली मिलावट. हवं तेव्हा औपचारिक, हवं तेव्हा औपचारिक, हवं तेव्हा अनौपचारिक. शिरीषने ना आजीबद्दल काही विचारलं ना जुन्या वाड्याबद्दल. ‘‘तेव्हा कसे ना आपण…’’ असं काही म्हणून ना तो उत्तेजित झाला, ना तो सूचक काहीतरी बोलून ‘जाऊ दे’ म्हणत न बोलताच खूप काही बोलला, ना त्याने तिच्या नव-याबद्दल, मुलांबद्दल विचारलं. ना त्याने स्वतःच्या बायकोमुलांबद्दल सांगितलं. औपचारिकतेतून अनौपचारिकता, अनौपचारिकतेतून जिव्हारी लागणारे प्रश्न असा काहीच प्रवास न करता त्याने एकदम तिस-या टप्प्यावर उडी मारली. कारण, आतापर्यंत जरी वीस-पंचवीस वाक्यंच बोलला असेल तो सावित्रीशी. पण त्याने तिला पुरतं ओळखलं होतं. कुणाशी कधी मान वर करून न बोलणा-या सावित्रीची प्रतिकारशक्ती पम्याने केव्हाच संपवली आहे हे काहीही प्रत्यक्ष न बघताही त्याला ठाऊक होतं. जुन्या नात्याने हे विचारण्याचा आपला अधिकारच आहे, आणि आपल्या विचारण्याचा हेतू वाईट नव्हता असं भासवण्यासाठी त्याने त्याच्या टायपिस्टची साक्ष काढली. ‘‘ऐकलंस का तू सुमे, त्या औषधांचा काही नाही उपयोग होत.’’ मग आपणच खुपसलेला खंजीर बाहेर काढून पुसत ‘काहीच जखम झाली नाही. तुला नाही मारलं, हिला हिला’ असं भासवत तो सावित्रीला म्हणाला, ‘‘अगं, हिची पण बहीण आहे ना अशीच. काही उपयोग नाही औषधांचा.’’ त्याने सुमीवर पण कुठला तरी जुना सूड उगवला. सावित्रीने तिचे शांत डोळे उचलून त्याच्याकडे पाहिलं. ‘चलते’ म्हणत टेबलावरची पर्स उचलली. काकाने दिलेलं पाकीट तिथंच पडू दिलं. …. नळावर पाणी भरताना तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसत विचारणा-या बायका, ‘‘काय गं, बरीय का पम्याची तब्येत?’’ कॉलेजात फॉर्मवर प्रिन्सिपॉलची सही घ्यायला गेलं की, ‘‘काय म्हणतोय भाऊ, बराय का?’’ बँकेत – ‘‘बराय का भाऊ?’’ भाजी मंडईत – ‘‘बराय का?’’ घराच्या उंब-याजवळ, ‘‘बघ गं बाई, काही लागलं तर सांग.’’ असा कसा हा समाज? तिला कधीच कळलं नाही. पम्याचे प्रश्न काय होते हे जाणून घेण्यासाठी कधीच कुणी पुढे आलं नाही. रोज अनेक कुत्सित चेहरे सावित्रीची पराभूत पाठ पाहात हसत बसले. तिच्याबरोबर कुणीच आलं नाही. आणि आता शिरीषसुद्धा? शिरीषच्या केबिनचा दरवाजा उघडताना सावित्रीला वाटलं आपण आजीच्या कॉफीतली वडी आहोत, एकेक कण सुटा होत विखुरणारी !
सुजाता महाजन
No comments:
Post a Comment