आज सकाळीच एका मैत्रिणीने व्हाॅटस्अपवर *सुरंगीचे* गजरे पाठवले. ते बघून माझी सकाळ तर सुप्रभात झालीच, पण असही वाटल कि परत एकदा ह्याचा सुवास दरवळावा आणि मी तो भरभरून घ्यावा.
मी सतत केसात गजरा नाहीतर फूल घालायची. मला फुलांच खूप वेड होत. लहानपणी आमच्याकडे एक गजरेवाला यायचा, त्याच्याकडून आई रोज २ गजरे घ्यायची. चार-साडेचार वाजता त्याची हाक यायचीच, "मोगरे ..." चार आणण्याला २ मोगऱ्यांचे सरळ ओवलेले गजरे मिळत. मला फिरवलेले गजरे कधीच आवडले नाहीत. त्यात फुल जास्त असली तरीही ! एक गजरा आई घालायची, दुसरा मी ओल्या रुमालात गुंडाळून माठावर ठेवायची. नंतरच्या काळात डब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवून, दुसऱ्या दिवशी शाळेत घालून जायची. मोगऱ्याला खूप सुंदर वास असे. कधी मदनबाणाचे गजरे आले कि ते घ्यायचे. चाफ्याची फुल... पण रोज फुल हवीतच ! काहीच नसलं तर एक मुलगी कोरांटीच्या फुलांचे पिवळे जांभळे गजरे आणायची, त्याचा तरी गजरा हवाच असायचा.
अशातच मार्च/एप्रिलमध्ये सुरंगी यायची. मी अगदी आतुरतेने वाट पहात असायची. "सुरंगी...." अशी दमदार हाक आली कि मी गॅलरीत धावायची. गजरेवाले काका वरती येतात नां, हे बघायची. त्यांना पण हसू यायच. म्हणायचे, 'ताई, आली बर कां सुरंगी ! सुरंगीच फूल नाजूक, पण वासाचा अगदी घमघमाट सुटायचा. हा गजरा जरा महाग असायचा. आठ आण्याला एक ! त्याचा दिमाखच वेगळा. सुंदर रंग, मोहक फूल आणि त्याचा तो सुगंध. ही फुलं फारच थोडे दिवस यायची. ती गजऱ्याच्या टोपलीतही वेगळीच ठेवलेली असायची. केळीच्या पानावर, वरून उन लागू नये म्हणून ओल्या फडक्यात पसरलेली. मी ही त्या गजऱ्याला खूप जपायची. ओल्या रुमालात गुंडाळून ठेवल्याने तो छान रहायचा . दुसर्या दिवशी शाळेत तो गजरा घालायची. सुरंगीचा गजरा जड असतो . पण माझे केसही खूप लांब व जाड असल्याने सहजपणे तो गजरा पेलायचे. दिवसभर त्या सुरंगीच्या फुलांचा दरवळ माझ्या सोबत असायचा. ते १५/२० दिवस मी सुरंगी घ्यायचीच आणि त्याचा बहर संपला की परत मोगऱ्याचा दरवळ होताच की सोबतीला.
त्या सुरंगीच्या गजऱ्याच्या एका फोटोमुळे ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्ष मी ते सुख अनुभवलं. नंतरच्या काळात सुरंगी मला कधी फारशी मिळाली नाही. बाकीची फुल मिळायची, पण सुरंगी नाहीच मिळाली.
५-६ वर्षांपूर्वी मार्च महिन्यात मी गोव्याला गेले होते. तिथे शांतादुर्गेच्या देवळाबाहेर सुरंगीचे गजरे विकायला ठेवले होते. मी धावत जाऊन गजरे घेतले व ओंजळीत घेऊन त्याच्या घमघमाटाच्या अनुभूतीने मी तृप्त झाले. मी अतिशय आनंदून गेले. केसात माळण्यासाठी म्हणून हातात गजरा घेतला खरा, पण आता वयपरत्वे केस पातळ व छोटे असल्याने, ज्या दिमाखात तो गजरा माझ्या लांबसडक केसात असायचा तो काही आता राहिला नाही, त्यामुळे मी काही तो केसात माळला नाही. पण दिवसभर अलवारपणे तो सोबत ठेवून, त्याच पूर्वीच्या त्याच्या सुगंधी स्मृतीत हरवून गेले....
मेधा सुळे
No comments:
Post a Comment