आरसा
अरे आरशा आरशा काय करतोस खुबीॽ जो जसा जसा आहे तशी दावतोस छबी।
अरे आरशा आरशा नाही आप पर भाव। नाही शत्रू नाही मित्र घेसी सत्याचाच ठाव।
अरे आरशा आरशा बिंब तसे प्रतिबिंब। कसा तटस्थॽ असो नोकर अथवा साहेबॽ
अरे आरशा आरशा जरा हो ना रे फितूर। आब वाढव ना माझी नसतानाही हुनर।
असे वदता मी त्याला रागावून लाल झाला। म्हणे मी का तुझे मन असे फितूर होण्यालाॽ
तुझे मन ही आरसा सत्य दाखवतोच आहे। परी अहंभाव धूळ वर माखलेली आहे।
त्यात तुझे प्रतिबिंब कसे दिसेल उमज। धूळ झटकून बघ सत्य दिसेल सहज।
असे मूळातच शुद्ध तुझ्या मनाचा आरसा। परी तुझ्याच कर्मांनी झाली त्याची ही दुर्दशा।
आता तरी सावध हो वदे आरसा मजला। नको नको सांगू त्याला असे फितूर होण्याला।
किती तत्त्वज्ञान मोठे आरशाने सांगितले। शुद्ध मनी प्रतिबिंब बिंबामध्ये सामावले।
शितल जोशी.
No comments:
Post a Comment