Monday, 1 June 2020

त्याचा आवाज

ती म्हणाली, “He has a beautiful voice.”

वैयक्तिक आयुष्यातील एका व्यक्ति विषयी सांगताना तिने हे विशेषण वापरलं. नवल वाटलं, कारण कुठल्याही
मुलीला अरिजीत सिंह खेरीज कोणा एका मुलाच्या आवाजावर भाळलेलं मी पाहिलं नव्हतं. पण खरं आहे, काही
आवाजांमध्ये जादू असतेच. त्यांच्यात संपूर्णपणे स्वस्थ असलेल्या मनाला हेलावून टाकण्याची किंवा एका वादळाला
शमवण्याची ताकद असते. चिंगारी कोई भडके, हे गाणं केव्हाही ऐका. मनात तीव्र भाव उमटल्याशिवाय राहणारच
नाहीत.

या गाण्याचं उदाहरण माझ्या ‘जादू’ च्या मुद्द्याला आधार देणारं असलं तरी मला एक गोष्ट कळली नाही. तो गाणी
कुठे गायचा? तो गाणं शिकलाही नव्हता, आणि गायचा तेव्हा त्याचा आणि सुरांचा अगदी बादरायणी संबंधही
स्थापित करणं अशक्य वाटायचं. अशी स्थिती असताना त्याच्या आवाजाने हिला कसं-काय आकृष्ट केलं? सध्या
विचित्रच गोष्टींचा ट्रेंड आहे, इतर तरुणांची पसंती जरा जास्तच बदलली आहे, असा न्यूनगंड निर्माण करणारा विचार
डोकावला.

ती उत्स्फुर्तपणे बोलत होती त्याच्याबद्दल. त्याचं वर्णन, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी-निवडी- सारं काही सांगत
होती. विषय मीच काढलेला- “काय बाई, तुमच्या गालावरच्या खळीचे दर्शन हल्ली रोजच घडतेय..”
रहस्य उलगडलं, “एक मुलगा आहे...”

एका क्षणासाठी मी पस्तावले. आणखीन एक बॉयफ्रेंड पुराण. म्हणजे काही दिवसातच आणखीन एका दुखावलेल्या,
तुटलेल्या हृदयाला मोकळं होण्यासाठी माझा खांदा उपलब्ध करून द्यावा लागणार, हा स्वार्थी विचार स्पर्शून गेला.
चेहऱ्यावर त्या विचाराची सावली न पडू देता मी उत्साह दाखवला. तिची स्टोरी सुरु झाली. पण जसजसं ती बोलत
होती, मला फार नवल वाटू लागलं.

पहिली भेट, पहिला संवाद, पहिलं आऊटिंग, मैत्री-टू-प्रेम या प्रवासाचे वर्णन जरी ती करत असली तरी रोख होता
त्याच्या आवाजावर.

“तो फार छान आहे गं!” टिपिकल. “स्मार्ट आहे, माहितगार आहे. ओपनही आहे. ठाम मत असतं त्याचं.”
शेवटच्या वाक्यावरून मी ‘जजमेंटल’ झाले खरी. बरं असतं या मुलींचं. आई-बाबांनी मत मांडलं तर त्या मर्यादा.
बॉयफ्रेंड ने तेच केलं तर इट्स क्यूट.

ती बोलत होती-
“त्याचा आवाज पाऊसासारखा आहे. सेम पाऊसासारखा.” पाऊसाकडे तिची विशेष, विलक्षण ओढ. जुलै मधला जन्म, त्यामुळे ती गमतीत म्हणायची की पाऊस तिचा ‘फॉरएव्हर बडी’ आहे- आयुष्याच्या पहिल्या-वहिल्या क्षणापासून तिच्या सोबत असणारा. खरंतर पाऊसाला आवाज नसतो. नाद होतो तो पर्जन्य-पृथ्वी भेटीचा; आणि याच नादाने तिला नादी लावले आहे. पाऊस पडू लागला की तिला इतका आनंद होतो की एखादा बेडूकही लाजेल. अशा या मेघकन्येने एका हाडामांसाच्या व्यक्तिला, वा तिच्या आवाजाला पाऊसासदृश मानणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे तुम्हाला वेगळं सांगणं उचित नाही.

“आम्ही भेटलो न, तेव्हा त्याचे विचार ब-याच बाबतीत वेगळे होते. मला तो थोडा होमोफोबिक वाटायचा. कला,
काव्य अशा विषयांशीही त्याचा थेट संबंध कधी आला नव्हता. किंबहुना त्याने तो कधी येऊ दिला नव्हता. आणि
आता बघ-” तिने मला स्क्रीनशॉट्स दाखवले. त्याच्या मित्रांच्या ग्रूपवर तो तिच्या कलाकृत्या मिरवतो, स्वतः
अलंकारिक लिहण्याचा प्रयत्न करतो. ती पेंट करते म्हणून त्याने ब्रश कसा धरायचा हे शिकून घेतलं. तिने रचलेल्या
काव्यातील प्रत्येक शब्दाचा हेतु तो हट्टाने तिच्याकडून जाणून घेतो.

मी तिचा एक मुद्दा हेरून तिरकसपणे म्हटलं, “ते सगळं ठीक आहे, पण तू तर म्हणालीस की तो ओपन आहे.. मग
होमोफोबिया? How are you okay with that?” ती अगदी खुल्या विचारांची आहे. तिचं पुराणमतवाद्यांशी
अजिबात पटत नाही.

स्मित. ती म्हणाली, “आम्ही खूप बोलतो, खूप चर्चा करतो. स्वतःची मतं ठामपणे मांडतो, दुसऱ्याने तीच योग्य आहेत
असा अट्टाहास न करता. त्यामुळे एकमेकांचे पटणारे मुद्दे आम्ही अंतर्भूत करून घेतो.” तो आता LGBTQ बद्दल
संवेदनशील झालाय. तिचंही इम्पलसिव्ह वागणं जरा संयमी झालंय. एका भावनावश कलाकारात हा किती ठळक
बदल!

खुले विचार, स्वतंत्र राहणीमान, स्वच्छंद राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या एका फेमिनिस्ट तरुणीचं मन जिंकणं सोपी
गोष्ट नाही, आणि तिच्या चेहऱ्यावरच्या गुलाबी छटांचं कारण बनणं तर त्याहूनही कठीण. जगात बढाईखोर
(प्रीटेन्शीयस) लोकांची कमी नसते. आश्वासक आहोत असं दाखवणारी खूप मंडळी मी पाहिली ज्यांनी मोक्याच्या
क्षणी ‘तिच्या’ मार्गाला बंद करत स्वतःच्या रस्त्यावर गाडी वळवली. परिणाम? एक तर मूक स्वीकृती, नाहीतर तीव्र
मतभेद.

माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असं काही नाही होणार, असं मनापासून वाटतं. प्रत्येक प्रसंगात त्याच्या आश्वस्त
करणाऱ्या आवाजाच्या अस्तित्वाची जाणीव होते. खरंच त्याचा आवाज वेगळा आहे. वेगळा म्हणजे असामान्य.
तिच्या बोलण्यातूनच मलाही त्याचा आवाज ऐकू आलाय.

-कश्मिरा सावंत

No comments:

Post a Comment