या स्त्रीरोगतज्ज्ञ एका शहराच्या थोड्या बाहेरच्या भागात प्रॅक्टिस करत होत्या.एक दिवस टिपिकल राजकारणी दिसणारा एक माणूस त्याच्या बायकोला घेऊन आला त्यांच्याकडे. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि आता परत तिसऱ्यांदा दिवस गेले होते.डॉक्टरांनी तपासलं तर साडेचार महिने झाले होते. नवरा म्हणाला "मी इथं जवळच्याच गावात ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी आहे.आम्हाला नकोय हे मूल ,गर्भपात करायला आलो आहे"
स्त्रीरोगतज्ज्ञ गर्भलिंगनिदान कायदा आल्यापासून तीन महिन्याच्या वरचा गर्भपात करायला साहजिकच खूप कचरतात.तीन महिन्यानंतर बाळ बऱ्यापैकी तयार झालेले असते त्यामुळे ही असा गर्भपात करणे नको वाटते काही डॉक्टरांना.आणि न जाणो हे लोक बाहेरून गर्भलिंगनिदान करून आले असतील तर आपल्यावर खोटा आळ यायचा.माणूस राजकारणी दिसल्यामुळे डॉक्टर अजूनच सावध होते.पापभिरू माणूस कायद्याला कायमच घाबरून असतो.त्यामुळे डॉक्टरांनी गर्भपात करता येणार नाही आणि प्रेग्नन्सी चालू ठेवून डिलिव्हरी झाली की ऑपरेशन करा असा सल्ला दिला .पेशंटचा नवरा खूप वेळ "गर्भपात कराच म्हणून आग्रह करत राहिला पण माझ्या तत्वात हे बसत नाही म्हणून डॉक्टरांनी साफ नकार दिलाच.
यानंतर मध्ये पंधरा वर्षं गेली.एक दिवस हाच माणूस दुसऱ्या एक पेशंटला घेऊन डॉक्टरांकडे आला.आधी ओळखलेच नाही डॉक्टरांनी पण मग त्यानेच ओळख दिली .म्हणाला "मॅडम तुम्ही गर्भपात करायला नकार दिलात,भलतीच पंचाईत झाली माझी.अहो मी लोकप्रतिनिधी आहे गावात.सरकारी नियमानुसार दोनच्या वर मुलं झाली असती तर पद गेलं असतं माझं.विरोधकांना तेच तर हवं असतं गावात..मग शेवटी बायकोला माहेरी पाठवून दिली.पूर्ण दिवस भरून डिलिव्हरी झाली आणि मग ते मूल मी सरळ अनाथाश्रमात देऊन टाकलं!पण मॅडम तिकडे आश्रमात खर्च मात्र आपण करतो बरंका सगळा.
हे ऐकून मात्र डॉक्टरांच्याच पायातले अवसान गळाले!!
" अहो तुम्ही पोटच्या गोळ्याला असं बेवारश्यासारखं अनाथाश्रमात कसं सोडू शकलात?त्या जीवाचा काय दोष होता???"डॉक्टर खरंच कळवळल्या..
"अहो मॅडम अशी पदे सहजासहजी मिळत नसतात, राजकारणात त्याग हे करावेच लागतात..चलतो मी.."
तो माणूस गेला निघून पण डॉक्टरांच्या मनात विचारांचं काहूर उठवूनच..
असं काही होईल हे माहीत असतं तर गर्भपात केला असता तर जास्त बरं झालं नसतं का?त्या जीवाचा काय दोष होता?आईवडील ,भावंड असूनही एक अनाथाचं जिणं नशिबी आलं त्याच्या..आणि मग त्याने दुसरीकडे जाऊन गर्भपात का नाही करून घेतला?की त्याला मुलगी झाली आणि ती नको होती म्हणून देऊन टाकली??आणि ज्या माऊलीचं बाळ काढून या अधमाने अनाथाश्रमात देऊन टाकलं तिची मानसिक अवस्था काय झाली असेल?कशी सहन केली असेल तिनं ही घुसमट?आपलं अजून एक भावंड अनाथाश्रमात आहे याची सर्व सुखसमृद्धीत असलेल्या मुलांना कल्पनाही नाहीये,कधी कळलं तर??
मग चुकले का मी?करायला पाहिजे होता गर्भपात?
हे निर्णय इतके सोपे असतात?
तुम्हाला काय वाटतं??
(डॉ पद्मजा जोशी यांचे आभार!!)
(पूर्णपणे सत्यघटना)
डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ
कोथरूड
पुणे
(डॉ पद्मजा जोशी यांचे आभार!!)
(पूर्णपणे सत्यघटना)
डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ
कोथरूड
पुणे
No comments:
Post a Comment