सरस्वतीची संगिता.
आज अचानक गीतेच्या संथावर्गासाठी एका महिलेचा फोन आला. तिने सगळी चौकशी केली आणि गीता
शिकून काय फायदा होईलॽ असे विचारले. मी तिला नाव विचारल्यावर तिने आपले नाव सरस्वती सांगितले
आणि माझ्या मनाने अचानक ३४ – ३५ वर्षांपूर्वी यवतमाळला आमच्या घरी येणाऱ्या धुण्याभांड्याच्या कामासाठी
येणाऱ्या सरस्वतीला समोर उभे केले. तिच्या मुलीनेही मला असाच प्रश्न विचारला होता एकदा. सारे दृश्य
आणि घटना कालच घडल्यासारख्या आठवू लागल्या.
सरस्वती नाव. पण परिस्थितीने शिक्षणाशी दुरूनही संबंध न आलेला, पण त्याची खंत वाटणारी एक
बाई, एक दोन मुलींची आई. नियमाने कामाला येणारी. आपल्या मुलींनी शिकावे यासाठी हवे ते कष्ट करायला
तयार असलेली. दुसरी मुलगी लहान होती अजून. पण मोठी शाळेत जाणारी पण शाळेचा अत्यंत कंटाळा
असणारी. काहीतरी निमित्त काढून शाळेत जाण्याचे टाळणारी. किंवा गेली तरी काहीतरी निमित्त काढून शाळेतून
पळून येणारी. भांडी घासायचे काम मनापासून आवडणारी. दर दोन तीन दिवसांनी माझ्याकडे आई यायच्या
आधीच पटकन काम करून जायची. कधी आई त्याचवेळी आली तर तिला रागवायची आणि मला म्हणायची,
‘ताई सांगा हो हिला शाळा बुडवू नकोस म्हणून.’ मी पण तिला ‘जात जा ग शाळेत, कशाला आईची बोलणी
खातेसॽ मजा असते शाळेत. मैत्रिणी असतात. गुरुजी छान कविता शिकवतात. खेळायला पण मिळते.’ असे
काही बाही सांगत तिची समजूत घालत असे. तीही हसून जाईन म्हणायची आणि तो विषय तेवढाच व्हायचा.
साधारण ५ ते ७ महिने असेच चालले. तिने शाळा बुडवायची, आईने रागवायचे आणि मी जमेल तशी समजूत
घालायचे. मग एक दिवस माझ्या मनात आले हिला विचारावेच की ती शाळेत का जात नाही ते. आणि असा
प्रसंग आलाच दोन चार दिवसात.
नेहमीप्रमाणे शाळेत न जाता आली कामाला. आज मी तिला काम करायच्या आधीच म्हटले थांब ग तू
मला आधी सांग तू शाळेत न जाता असे काम करायला का येतेसॽ त्यावर तिने जे उत्तर दिले ते असे, ‘मावशी,
आम्ही सगळेच जर शाळा शिकून शहाणे झालो तर तुम्हाला कामाला कोण मिळेल होॽ’ चिमुरडीने जे उत्तर दिले
त्याचा विचार करणे भाग पडले मला. शिकल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा आपण चांगला
उपयोग करुन घेऊ शकतो हाच माझ्यावरचा संस्कार असल्याने मला स्वतःला असे कोणी विचारेल ही अपेक्षाच
नव्हती.
शिकल्यानंतर ही कामे करणे शक्य नाही असा समज आपल्या शिक्षणाने होतोय काॽ तिच काय कोणीही
अवतीभोवती जे घडतेय, दिसतेय त्याचा अर्थ काय काय लावतोयॽ याचा आपणही विचार करायला हवा.
आठवडाभर मी याच विचाराने पछाडले होते. सगळ्यांचा विचार आपण बदलू की नाही माहित नाही पण या
मुलीचा तरी गैरसमज दूर करायचा हे ठरवले. मग एक दिवस तिला जवळ बसवून घेतले आणि सांगितले की तू
तुला भांडी घासायला आवडते न मग रोज माझी घासायला ये पण शाळा सुटल्यावर. तिच्या आईलाही सांगितले
येऊ दे तिला कामाला. ती शाळा सुटली की येईल. आठ पंधरा दिवसांनी तिला एकादे पुस्तकाचे नाव सांगून
कपाटातून काढून दे, टेबलावरचा असे असे लिहिलेला कागद मला आणून दे अशा गोष्टी सांगत असे. तिला
वाचता येतच नसल्याने तिचा गोंधळ व्हायचा मग मी हळूच तिला म्हणायचे बघ तू शिकलीस की ज्यांच्याकडे
काम करशील त्यांची ही पण काम तू पटकन करु शकशील की नाहीॽ ते तिला पटायला लागले आणि ती
हळूहळू वाचायला, मग लिहायला आणि अशीच आकडेमोड करायलाही शिकली. थोडी मोठी झाल्यावर तिला
म्हटले की तू जर शिकली नाहीस तर तुला नवराही न शिकलेलाच मिळेल. आता जसे छोट्या घरात लांब रहावे
लागते तसे नंतरही रहावे लागेल. त्यातून नवरा व्यसनी असला तर तुमच्या आजूबाजूच्या बायकांना पहातेस तसे
मारही खावे लागेल. ही मात्रा बऱ्यापैकी लागू पडली तिला. मनावर घेऊन अभ्यास करु लागली. पहाता पहाता
दहावी झाली. बारावी झाली. डी. एड. झाली. आय. टी. आय. झालेला नवरा मिळाला. आज दोघेही छान संसार
करतात. दोन मुलांची आई असलेली शिक्षिका आपल्यासारख्या विचार करणाऱ्या मुलींना नक्कीच चांगला संस्कार
देत असेल याची मला खात्री आहे.
मी स्वतःही द्विपदवीधर असून नोकरी न करता पिको, फॉल, शिवण करायला लागल्यानंतर मी जे
करतेय याबद्दल अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कीव पाहिली नंतर. घर सांभाळणे, गृहिणी असणे किंवा ज्यातून
अधिक पैसा मिळत नाही असे काम करणे ‘अधिक शिक्षण घेतलेल्या महिलेसाठी योग्य क्षेत्र नाही’ असाच
अविर्भाव अनेकांनी व्यक्त्त केलेला अनुभवला आहे. नोकरी न करता असे दोन चार रु. मिळवावे लागतात म्हणजे
नवऱ्याला काही व्यसन आहे का इतपर्यंतही काहींची दबकत दबकत विचारणाही झाली होती. आजही यात खूप
मोठा बदल झाला आहे असे दिसत नाही. काहींची मानसिकता मात्र निश्चित बदलली आहे. परदेशात राहणाऱ्या
तुम्हा मुलींना आधुनिक साधनांचा आधार असला तरी ही सगळी कामे निश्चितपणे करावी लागतात. तो तुमच्या
आयुष्याचा सहजभाव झालाय आता. सध्या कोरोनामुळे भारतातल्याही सगळ्या महिलांना तुमच्यासारखेच घरातले
सगळे करुन आपले करियर चालू ठेवतांना हा अनुभव आणि विचार बदलवण्याची प्रक्रिया प्राप्त करुन देतील
असे मानू या.
Padma Dabke
No comments:
Post a Comment