Monday, 1 June 2020

कैलास लेण्यात ठेवलेला संदेश

कैलास लेण्यात ठेवलेला संदेश

सुजाता महाजन           

    सकाळपासून पद्माची तारांबळ सुरू झाली. विपाशाने काल रात्री झोपताना जाहीर केलं होतं, मी उद्या बाबांबरोबर बाहेर पडणार. आता ही बाबांबरोबर बाहेर पडणार म्हणजे बाबांच्या वेळेत हिचं आवरून व्हायला हवं, नाही तर बाबा चिडणार. विपाशाला त्याची काही फिकीर नाही. ती बिनधास्त.

    पद्माची मात्र ओजसने चिडू नये म्हणून धडपड. विपाशाला लवकर उठवण्यासाठी धडपड. तिने लवकर आवरावं म्हणून धडपड. ओजसच्या वेळेसच तिने अंघोळीला जाऊ नये म्हणून धडपड. आंघोळ झाल्यावर तिचं कपड्यांचं सिलेक्शन आणि त्यावर सूट होणा-या ॲक्सेसरीज निवडणं मंदपणे चालू राहतं, त्यासाठी मागे लागणं. तिने नीट खाऊनपिऊन बाहेर पडावं म्हणून धडपड.

    दरम्यान, नव-याला त्याचे कपडे शोधून द्या, टॉवेल द्या, तो बाथरूममध्ये जाण्यापूर्वी बाथरूम चेक करा, साबण संपलाय का, बाथरूम घसरडं नाही ना, केसांचं गुंतवळ पडलेलं नाही ना? अंघोळ करून बाहेर आला की त्याचं कपड्यांचं सिलेक्शन, त्याला हव्या त्या शर्टची जोडीदार पँट इस्त्रीला गेलेली नसणं, शर्टचं बटण तुटलेलं नसणं, पॅण्ट पायाशी उसवलेली नसणं, शर्ट चुरगाळलेला नसणं, स्वच्छ रुमाल सापडणं, डबा भरलेला असणं, खाण्याची डिश तयार असणं, पाण्याचा ग्लास भरलेला असणं या सगळ्या गोष्टी दोरीत व्हायला हव्यात; नाही तर चिडचीड.

    या काही चिडचिडीच्या जागांव्यतिरिक्त एक उलटतपासणीचा कार्यक्रमही.

    ... ‘‘बँकेत गेली होतीस का?... का नाही गेलीस?’’

    ... ‘‘कूरिअर केलंस का?’’

    ... ‘‘फोनची तक्रार नोंदवली नाहीस?’’

    ... ‘‘टीव्हीवर केवढी धूळ दिसतेय. साफ का नाही?’’

    ... ‘‘पंखे कधी साफ करायचेत?’’

    ... ‘‘विपाशानं मोबाईल रिचार्ज केला का?’’

    ... ‘‘गाडी आणली का दुरुस्तीला टाकलेली?’’

    उलटतपासणीच्या तासाला कोणते प्रश्न विचारले जातील, याचा अंदाज पद्माला होता. तिचा गृहपाठ तयार असे. विपाशा मात्र अशा प्रश्नांना भीक घालत नसे. ‘‘ओ बाबा, आज करते ना!’’ असलं उत्तर देऊन मोकळी होत असे. मग पुढचं लेक्चर ऐकायला पद्मा होतीच.

    दोघं बाहेर पडले की पद्मा घरातल्या कामांकडे वळायची. अंथरूणं आवरणं, धुतलेले कपडे इस्त्रीला देणं, कपड्यांच्या घड्या करून ज्याच्यात्याच्या कप्प्यात ठेवणं, केरवारे, साफसफाई... या जोडीला बाहेरची कामं. मग शांतपणे बसून कामांची यादी करायची, त्यांचा क्रम ठरवायचा मग स्कूटी घेऊन बाहेर पडायचं. एकेक काम करायचं, घरी आलं की लिस्ट चेक करायची, हिशोब लिहायचा. 

    गेले काही दिवस आपल्यामध्ये हळूहळू बदल होतोय, असं तिच्या लक्षात यायला लागलं होतं.

    सगळ्या गोष्टी तिने नीटनीटक्या, व्यवस्थित कराव्यात, वेळेत कराव्यात अशी अपेक्षा सर्वांचीच होती. ती त्या करतेय म्हणून सगळं नीट चाललंय याची जाणीव मात्र कुणालाच नव्हती. विपाशाला ती काही सांगायला लागली, की विपाशा म्हणायची,‘‘आई, आता तू लेक्चर द्यायला नको घेऊस हं!’’

    नव-याला काही सांगायला लागलं, की तो म्हणायचा, ‘‘बरं बरं, सगळ्या तक्रारी आताच सांगायचं काही कारण नाही.’’

    तिला बाहेर जायचं असलं तर सगळ्यांची सगळी व्यवस्था करूनच जावं लागे. कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं, याचं अँटिसिपेशन तिला आधीच करता येत असे; मग दुष्परिणाम टाळण्यासाठीचे प्रयत्न.

    काल रात्री सगळेजण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ पाहण्यात गुंग होते. तेवढ्यात विपाशाचा फोन वाजला. फोनवरच्या संभाषणात सीरियलमधले सगळे शब्द गिळले जायला लागले. ओजसच्या चेह-यावरचे भाव बदलायला लागले. लगेच पद्माचंही सीरीयलमधलं लक्ष उडालं.

    तेवढ्यात अर्ध्या तासाचं फोनवरचं संभाषण संपवून विपाशा बाहेर आली. खरं म्हणजे ओजसच्या फुगलेल्या चेह-याकडे तिचं लक्ष गेलं होतं. पण तिकडे दुर्लक्ष करून ती पद्माला सांगायला लागली, ‘‘आई, माझा प्रोजेक्ट खूप आवडला आमच्या सरांना. आज वर्गात त्यांनी खूप कौतुक केलं. त्यासाठीच शर्मिलाचा फोन होता.’’

    पद्माने ओजसकडे चोरटा कटाक्ष टाकला. त्याला लेकीचं काही कौतुक वाटतंय का हे बघण्यासाठी, पण तसं काही दिसलं नाही. 

    सगळेजण जेवायला बसले. विपाशा म्हणाली, ‘‘मला भूक नाही. मी विद्याकडे जाऊन येते.’’

    तिने पायात चपला अडकवल्या आणि बाहेर पडली. अर्थात्‌ ओजसला हे आवडलेलं दिसलं नाही. त्याला विपाशाच्या विचारांपासून दूर न्यावं म्हणून ती काही तरी सटरफटर सांगत राहिली.

    ‘‘बरं का रे, आज मला शाम्पूची बाटली सापडत नव्हती. खूप शोधली. नंतर बाथरूममध्ये खाली ठेवलेली दिसली.’’ मी म्हटलं, ‘‘अरे, ही बाटली इथं कशी काय?’’ तर आपली बाई म्हणते, ‘‘मी मोरी धुतली, बेशिन धुतलं की त्यानं. छान लक निगालं बगा. ह्येच आनत जा न्हेमी.’’ मी म्हटलं, ‘‘बाई ग, तू धन्य आहेस.’’

    ओजस हसला नाही. उलट चिडून म्हणाला, ‘‘काढून टाक तिला. दगड आहेत डोक्यात तिच्या. एका बाथरूममध्ये सगळ्या बादल्या ठेवते आणि दुस-यात सगळे मग्ज. आंघोळीला लागलं की मग सापडत नाही. तर कपडे काढल्यावर बादलीच नसते.’’

    ‘‘बरं बरं,’’ पद्माने संभाषण आवरतं घेतलं. पानं वाढल्यावर ओजसने विचारलं, ‘‘ही कसली भाजी?’’

    ‘‘वालाची.’’

    ‘‘मला नको वालाची भाजी. ते वाल, घेवडे, दोडके, भोपळे असल्या भाज्या करत नका जाऊ. दिवसा नीट जेवण झालेलं नसतं. रात्री तरी नीटनेटकं असावं ना, तर असल्या भाज्या.’’

    ‘‘अरे, याच भाज्या तब्येतीला चांगल्या असतात. त्या अल्कलाईन आहेत.’’

    ‘‘ते तसलं मला काही सांगू नकोस. मला चांगल्या भाज्या हव्यात, कळलं?’’

    ‘‘बरं, आता तर खातोस का?’’

    ‘‘नाही, मला दुसरं काही तरी दे.’’

    तिनं पिठलं करायला घेतलं. पाच-सात मिनिटांत गरमागरम पिठलं पानात पडल्यावर महाराजांचा राग थोडा शांत झाला. खाईपर्यंत तोंड बंद राहिलं.

    जेवण झालं की, बाल्कनीत उभं राहून एक सिगरेट ओढायची हा रोजचा प्रोग्रॅम. पुन्हा पद्मासाठी संकटकाळ. कारण यात त्याला पुन्हा काहीतरी सुचायचंच.

    ‘‘आली नाही का विपाशा अजून?’’

    ‘‘नाही.’’

    ‘‘फोन कर तिला. रात्रीचं उगीचच्या उगीच लोकांकडे जायचं. समजत नाही का तिला ?”

पद्माने दुसऱ्या खोलीत जाऊन फोन लावला, “ अगं, किती वेळ?”

“आलेच गं. किती दिवसांनी भेटतोय आम्ही.”

“लवकर ये. बाबा विचारतायत.”

“हो, हो,हो.”

    ओजसची सिगरेट संपली. तो झोपायला गेला. पद्मा मागची आवराआवरी करेपर्यंत घोरायलाही लागला. त्याच्या घोरण्याचा आवाज ऐकून पद्माने नि:श्वास सोडला. हळूच बेडरूमचं दार लोटून ती टेरेसमध्ये गेली. तिथल्या आरामखुर्चीवर विसावली.

    सर्वत्र शांतता पसरली होती. इतकी, की रातकिड्यांचाही आवाज येत होता.

    चला! आजच्या दिवसातून आपली सुटका झाली. आता रात्र निर्वेध. तरी अजून विपासाचं घरी येणं, जेवण, झाकपाक, दिवे मालवणं, तिचे फोन्स हे सगळं संपायला तास - दोन निश्चित लागणार होते. तोवर शांत झोप मिळण्याची शक्यता नव्हती.

    हे असंच चालू होतं सध्या. तरुण विपाशाचे बापाशी खटके उडत होते. तिचं उशिरा घरी येणं, तासन्‌ तास फोनवर बोलणं, रात्री - अपरात्री फोनवर बोलणं, उशिरा उठणं, अव्यवस्थितपणा, बेशिस्तपणा या सगळ्याबद्दलच ओजस नाराज होता आणि सतत कुठल्या न कुठल्या गोष्टीवरनं रागावत राहणं, उपदेश करत राहणं याने विपाशा वैतागून गेली होती. जगाच्या अनुभवाने पोळलेला बाप मुलीला पोळावं लागू नये म्हणून सतत काही तरी सांगत राहायचा. मुलीला उपदेशापेक्षा अनुभवजन्य ज्ञानातून कळणं स्वाभाविक होतं. पण ओजसला वाटायचं, प्रत्येकानेच ठेच खाऊन कशाला शिकायचं? दुस-याच्या अनुभवातनं शिकायला काय हरकत आहे?

    विपाशा कधी कधी वैतागून म्हणायची, ‘‘आई, बाबा किती पिळतात ग! आपण एक गोष्ट करेपर्यंत सारखं विचारत राहतात आणि ती केली की त्या क्षणापासून दुस-या गोष्टीबद्दल विचारायला सुरुवात.’’

    पद्मा दुखावून म्हणायची, ‘‘असं नाही गं विपाशा, त्यांनी एवढे कष्ट केलेत, इतक्या गरिबीत दिवस काढलेत. त्यांच्याजवळ जबरदस्त व्हिजन असल्यामुळेच एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही ते एवढ्या वरच्या हुद्यावर जाऊ शकले. अशा माणसांना वेळेचं, व्यवस्थितपणाचं, पाठपुराव्याचं आणि इंटेग्रिटीचं खूप महत्त्व असतं. या गोष्टींना महत्त्व न देणं त्यांना सहन होत नाही.’’

    घरात दही जास्त आंबट आहे किंवा मोजे धुतलेले नाहीत म्हणून ओजस चिडचीड करत असताना तिला तो कोणती मोठी गोष्ट पाहतोय, ती करताना येणारे कोणते अडथळे तो झेलतोय हे दिसत असायचं. आजूबाजूच्या माणसांची पाय खेचण्याची वृत्ती, त्यांचे इगो प्रॉब्लेम्स, स्वतःला इंस्टिट्यूशनपेक्षा महत्त्व देणं या सगळ्यातून जिद्दीनं काम पुढे नेताना, इंस्टिट्यूशन पुढे नेताना त्याला किती झगडावं लागतंय हे तिला त्याने न सांगताही समजत होतं. पण व्यवसायत व्हिजन आणि चिकाटीने पुढे जाणारा ओजस एका विशिष्ट व्यावसायिक वर्गाशी संबद्ध होता. तरुण पिढी कशी बदलतेय, तिची मूल्यसरणी बदलतेय, तिच्यामुळे समाजाचं पोत बदलतंय याची फारशी जाणीव त्याला नव्हती.

    पण पद्माला विपाशाची प्रत्येक गोष्ट ठाऊक होती. तिच्या पिढीच्या तरुणांकडे तिचं बारकाईने लक्ष होतं. कोणत्या परिवर्तनाच्या काळात विपाशाने कोणती मुळं घट्ट धरून ठेवलीत आणि स्वतःपुरता तरी संस्कृतीचा -हास थोपवलाय, हे तिला चांगलं ठाऊक होतं.

    वडिलांनी किती सोसलंय आणि त्यांच्या आग्रही वागण्यामागे केवढी दूरदृष्टी आहे, हे कळण्याइतकी परिपक्वता विपाशात नव्हती. जेव्हा पद्मा तिला ओजसविषयी सांगायची, त्याचं म्हणणं समजावून सांगायचा प्रयत्न करायची तेव्हा विपाशा म्हणायची, ‘‘तुला सगळं बाबांचंच बरोबर वाटतं.’’

    जेव्हा ती ओजसला विपाशाच्या वागण्यामागची भूमिका सांगायला जायची तेव्हा तो म्हणायचा, ‘‘तू मला नको शिकवूस. मी काय तिचा शत्रू आहे का? तिच्याच भल्यासाठी मी हे सांगतोय ना? तू मला सपोर्ट करण्याऐवजी उलट मलाच सांगत बसतेस तिचं कसं बरोबर आहे म्हणून.’’

    अशा वेळेस पद्मा गप्प बसत असे. तिला हे कळत नव्हतं की, आपण मध्ये पडून या दोघांमधलं अंतर आणखी वाढवत आहोत. याखेरीज दोघांपासून दूर जात आहोत. तिला वाटायचं, या दोघांमध्ये दुरावा असू नये.

    सगळ्यांचं सगळं बरोबर होतं. जो तो आपापल्या जागी बरोबर होता. पण पद्माचं काय?

    ओजस एका बड्या कंपनीत होता. डिसिजन मेकिंगची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. ज्या डिसिजनवर अनेकांची आयुष्यं अवलंबून असतात असा डिसिजन घेताना, एखाद्या सीव्हियर प्रश्नाचा पाठपुरावा करताना काहीतरी निर्णयापाशी येण्याचा क्षणही क्रिएटिव्ह असतो. त्या तरल क्षणाला दुर्दैवाने विपाशाचा फोन सुरू व्हायचा आणि लवकर संपायचा नाही. अर्धा तास मेंदू व्यापून टाकायचा. अशा वेळेस संतापलेल्या ओजसला काहीही छोटंसं निमित्त पुरायचं. मग आरडाओरडा, फेकाफेकी, गोंधळ....

    पद्माचा रोजचा दिवस ‘आज काय होणार?’ या चिंतेत सुरू व्हायचा. दिवस संपला की ती सुटकेचा निःश्वास टाकायची.

    लहानपणापासून पद्मा स्वभावाने शांत, गरीब होती. भोवतालच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजकडे शांतपणे पाहत राहायची. कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायची नाही, आग्रह धरायची नाही. ती शांत असली तरी तिच्या आसपासचं जग शांत नव्हतं. तिच्या घरात आई- वडील, भाऊ - वडील, आई - भाऊ अशा तीन जोड्या आलटूनपालटून भांडणं करायच्या. सगळे एकमेकांविरुद्ध होते. कधी कधी मारामा-याही व्हायच्या. अशा वेळेस ती घराबाहेर पडून रस्त्यावर धावत सुटायची, घरापासून दूर दूर... तरी ते हिंसक आवाज तिचा पाठलाग करायचे. ती एखाद्या घराच्या भिंतीला चिकटून उभी राहून कानांत बोटं घालायची. खूप वेळाने आवाज शांत झाले, की ती हळूच घरी जायची.

    तेव्हा एक सत्य तिला कळलं होतं. आपण शांत स्वभावाचे असू, संघर्ष टाळण्यासाठी वाटेल ते सहन करायची आपली तयारी असेल, आपण स्वतःसाठी काहीही न ठेवता दुस-याला खूष ठेवायचा प्रयत्न करू ; पण म्हणून शांती, समाधानावर आपण हक्क सांगू शकतो का? तर तसं नाही. आपली शांती, आपलं समाधान.. आपल्या हातात काहीच नाही. अगदी कमीत कमी गरजा ठेवा, जे असेल त्यात समाधान माना, दुस-याला सतत मदत करून त्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा तरीही आपण शांततेवर हक्क सांगू शकणार नाही. मग काय करावं?

    घरातली माणसं भांडली नाहीत तर बाहेर कुणी तरी भांडत असतं. घरोघरी, दारोदारी माणसं भांडत असतात. काटेरी शब्दांचे सपकारे एकमेकांवर ओढत असतात, कधी गळा फाटेपर्यंत ओरडतात, शिव्या घालतात, मारामा-या करतात.

    हे असं का? माणसं एकमेकांशी का भांडतात? समाधानी का नसतात? दुस-याला ओरबडण्यात त्यांना काय आनंद मिळतो? 

    हे प्रश्न तिच्यापुढे होते, ज्यांची उत्तरं तिला कुणी आयती आणून देणार नव्हतं.

    कुणीच कुणाशी भांडू नये, दुस-याला दुखवू नये ही तिची जगाकडनं असलेली अपेक्षा अवाजवी होती. पण तशी ती का होती? संघर्षाची संगती न लागणं हेच त्यामागचं कारण होतं.

    ओजस आणि विपाशा बाहेर पडल्यानंतर घरातली कामं आटपून ती बाहेर पडली. बरीच कामं तिला संपवायची होती. कामं दूरवरची होती, म्हणून स्कूटी न घेता ती बसने निघाली.

    खूप दूरवर एका सुनसान रस्त्यावर बस बंद पडली. पाच-दहा मिनिटांत कंडक्टरने जाहीर केलं, बस पुढे जाणार नाही. दुसरी बस येऊन लोकांना पिकअप करेपर्यंत तिथंच थांबावं लागणार होतं.

    सारे लोक उतरले. शांत रस्ता, बाजूला गर्द झाडी; झाडाखाली लोक थांबून राहिले.

    पद्मापण एका मोठ्या झाडाखाली बसली. पक्ष्यांचे आवाज येत होते. रस्त्यावर वाहनांची अगदी तुरळक ये-जा होती. काही लोक रस्त्यावरच्या लोकांकडे लिफ्ट मागून गेलेसुद्धा.

    थोड्या वेळाने पद्मा उठून उभी राहिली. झाडापासून थोडं दूर जाऊन कुठे कुठे काय काय आहे हे पाहायला लागली.

    पूर्ण अनोळखी रस्ता, अनोळखी झाडं, अनोळखी लोक, अनिश्चिततेच्या छायेत अनिश्चित काळ...

    कधी तरी कुठे तरी वाचलेल्या ओळी एकदम तिच्या मनात उमटल्या -

    ‘‘जिंदगी से चुराकर लाई हूँ

    आज

    एक पल!

    सचमुच, मेरा अपना!’’

    हा काळाचा तुकडा! ज्यावर कुणीही हक्क सांगणार नाही, कुणीही अधिकार गाजवणार नाही असा हा तुकडा. पाण्यात मीठ विरघळावं तसा मनावरचा एकेक ताण हलका हलका करणारा. पायात खोल रुतलेला लांब टोकदार काटा कुणी उपसून टाकल्यानंतर वाटावं तसं खोल समाधान, दीर्घ तहानेच्या क्षणानंतर पाण्याच्या थंड घोटासारखं, गळ्यातून छातीतून अन्ननलिकेतून उतरणा-या गारव्यासारखं.

    कित्येकदा अनोळखी रस्ते माणसाला भूल पाडतात. बाजूचे निळे डोंगर, सभोवार पसरलेली हिरवळ, छोटी छोटी रंगीबेरंगी रानफुलं, मधूनच गाण्याची लकेर घेत उडणारे पक्षी, चमचमणारं ऊन, निळंभोर आकाश पाहताना मंत्रमुग्ध होऊन मागचापुढचा संदर्भ विसरून चालायला सुरुवात करावी; आपण कुणाचे कुणी नाही, आपल्या पदराला कुठल्याच आठवणींची गाठ नाही. शरीर आसमंतात विरघळेपर्यंत चालत रहावं, चालत रहावं, चालत राहावं, संपून जावं..

    पण असं होत नाही. न विरघळणा-या शरीराचा अडथळा असतो आणि त्या शरीराला चिकटणा-या सुखदुःखांच्या संदर्भाचा. सुखदुःखं, ताणतणाव, भयचिंता, संघर्ष का?

    या अचानक हाती आलेल्या काळाच्या तुकड्यात ती स्वतःला तपासून पाहू लागली. जगात कुठेच, काहीही संघर्ष असू नये असं वाटणं आरोग्यपूर्ण मनाचं लक्षण असेल का? सृष्टीच्या कानाकोप-यांत संघर्ष आहे, घर्षण आहे. अगदी रोजच्या स्वयंपाकातल्या साध्या साध्या गोष्टीपासनं. भाज्या ‘चिराव्या’ लागतात, फळं ‘कापावी’ लागतात, दाणे ‘कुटावे’ लागतात, ‘भाजावे’ लागतात, गव्हाला पीठ होईपर्यंत दळावं लागतं, शेंगा फोडाव्या लागतात, उजेडासाठी मेणबत्तीला ‘जळावं’ लागतं, वाढलेली नखं कापावी लागतात, केस कापावे लागतात, नारळ ‘आपटून फोडावा’ लागतो, दूध ‘तापवावं’ लागतं. पाणी उकळावं लागतं. अंडी ‘उकडावी’ लागतात, लसूण ‘ठेचावा’ लागतो. हे सगळे शब्द... भाजणे, कुटणे, उकळणे, उकडणे, तापवणे, शिजवणे, ठेचणे, आपटणे, फोडणे, तोडणे, जाळणे, कापणे, चिरणे, हे सगळे शब्द एक संस्कृती घेऊन उभे आहेत. ती संस्कृती आहे या कृती करणा-यांची.

    पद्माच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडल्यासारखं झालं. काही महिन्यांपूर्वी ती अजिंठा - वेरूळ लेणी पाहायला गेली होती. अजिंठा लेण्यांत खूप सुंदर रंगीत चित्रं, जपानचं साह्य मिळाल्याने नीटनेटक्या अवस्थेतली लेणी, पाण्याच्या थेंबावरही दया करणा-या बुद्धाचं जीवनचरित्र त्यात रेखाटलेलं. शांती, करुणा, प्रेम आणि वैराग्याने ओतप्रोत भरलेलं.

    त्या पार्श्वभूमीवर जेव्हा ते वेरूळला आले, सगळीकडे घाण, कुबट वास पसरलेला. लेण्यांमध्ये थांबणंही शक्य नव्हतं. तेवढ्या काळात अगदी दारासमोरचं शिल्प निरखताना तिला काही तरी जाणवून गेलं होतं. ते तेव्हा स्पष्ट झालं नव्हतं, आता तिला ते नीट आठवलं.

    वेरूळच्या कैलास लेण्यातल्या शिल्पांमध्ये सूर्य, शस्त्रास्त्रं हाती धरलेल्या देवांच्या मूर्ती, चक्र, रथ अशांसारख्या प्रतीकांमधून सळसळतं, क्षणोक्षणी बदलणारं, कृतीच्या आणि संघर्षाच्या सर्व खुणा दाखवणारं जीवन प्रतीत होत होतं. तिथं शांतता नव्हती, आवाज होते. वैराग्य नव्हतं, विलास होते. करुणेऐवजी युद्ध होतं, जिवंतपणा होता. कैलास लेण्याची दुर्दशा हा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा भाग होता, तरी कैलास लेण्यात कुणासाठी तरी संदेश ठेवलेला होता. असाच कुणाला कधी अजिंठ्यात वैराग्याचा संदेश सापडला असेल. पण पद्माला जे आवश्यक होतं ते तिला सापडलं होतं. संघर्ष आणि जगण्याचं घट्ट नातं तिला समजलं होतं, तेही अचानक हाती आलेल्या काळाच्या तुकड्यामुळे!

    नाही तर, कैलास लेण्यामध्ये जाणवलेलं ‘ते’ काही तिला आज असं लख्खपणे समजलंच नसतं!

No comments:

Post a Comment